रम्‍य पहाट मराठी निबंध - एक प्रसन्न पहाट मराठी निबंध

पहाटेची भ्रमंती किंवा एक प्रसन्न पहाट मराठी निबंध

रम्‍य पहाट मराठी निबंध

रम्‍य पहाट मराठी निबंध

        मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोहोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही. मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. मी अमितला विचारले, बाहेर एक फेरी मारू या का?" अमितने लगेच होकार दिला. मग पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो.
 
       सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. मी आणि अमित मूकपणे चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतताव प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. आम्ही टेकडीवर पोहोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होत

       पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार दिसत होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!' पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंत:करणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते ! त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो.

     परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशी वृंदावनां पुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती. पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.

रम्‍य पहाट मराठी निबंध - एक प्रसन्न पहाट  मराठी निबंध

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post