शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध
[मुद्दे : शालेय उपक्रमांचे वाढते महत्त्व उपक्रम सांघिक - वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन - आलेले अनुभव साहित्यिक प्रकल्प चांगले अनुभव - छोट्या प्रयत्नांतून मोठे यश.]
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध
नवीन अभ्यासक्रमानुसार शालेय अभ्यासक्रमात उपक्रमांना खूप महत्त्व आले आहे. त्याआधीच आमच्या शाळेत अनेक उपक्रम चालत; पण आता तर प्रत्येक विषयांतर्गत विविध उपक्रम सुरू झाले आहेत. या उपक्रमांत विदयार्थ्यांना भाग घ्यावाच लागतो. कारण त्यांना गुण ठेवले आहेत. यावर्षी मीपण काही उपक्रमांत भाग घेतला आणि मला चांगले-वाईट अनेक अनुभव आले.
आमच्या शहराच्या महापौरांनी 'हरित शहर' असे ध्येय समोर ठेवले होते. त्यासाठी खूप झाडे लावायची होती. आमच्या वर्गाचा या उपक्रमात सहभाग होता. वर्गात पन्नास विद्यार्थी होते. आम्हांला पावसाळ्यापूर्वी पन्नास झाडे लावायची होती आणि वाढवायची होती. झाडे लावण्यासाठी जागा शोधण्यापासून सर्व कामे आम्हांलाच करायची होती. 'वन-उपवन खाते' आम्हांला रोपे आणि ती लावण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी देणार होते. बाकीची जबाबदारी आमची होती.
आम्ही मोठ्या उत्साहाने कामाला लागलो. आमच्या उपक्रमाची माहिती थोडक्यात लिहून काढली. त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेतली. नंतर गावातील प्रत्येक बंगलेवाल्याकडे जाऊन विनंती केली की, आम्हांला एक झाड तुमच्या अंगणात लावायला अनुमती दया. काहीजणांनी आमचे खूप कौतुक केले व आम्हांला प्रकल्पासाठी जागा दिली. पण काहीजणांनी आम्हांला नकार दिला. आम्हांला जवळजवळ हुसकावूनच लावले ! हा एक आगळाच अनुभव आला ! मिळालेल्या जागांवर आम्ही वृक्षारोपणाचे काम केले. तेव्हाही वेगवेगळे अनुभव आले. आमचेच काही वर्गमित्र फार कामचुकारपणा करीत होते. आम्ही लावलेली रोपे मोठी झाली, तेव्हा आम्हांला खूप आनंद झाला. आताही वेळोवेळी जाऊन आम्ही त्या झाडांची काळजी घेतो. घरमालकही आमचे कौतुक करतात. आम्हांला शाबासकी देतात. सातत्याने एखादे काम केले तर यश चालत येते, हा अनुभव आम्हांला मिळाला.
दुसरा उपक्रम होता मराठी साहित्यातला. पुण्याच्या 'साधना' मासिकाने एक स्पर्धा जाहीर केली. विदयार्थ्यांनी पू. साने गुरुजींची पुस्तके वाचावीत व त्यांतून पंच्याहत्तर सुवचन गोळा करावीत. ही स्पर्धा सामूहिक होती. प्रत्येक वर्गाचा एक गट मानण्यात आला होता. आमच्या वर्गाने त्यात भाग घेतला. शाळेच्या ग्रंथालयातून गुरुजींची पुस्तके घेतली व वाचून काढली. बघता बघता तीनशेच्यावर सुवचने जमली. मग एका पानावर एक सुवचन सुवाच्य अक्षरात लिहिली. त्याच्या तीन छोट्या वया केल्या व त्या साधना साप्ताहिकाकडे पाठवल्या आमच्या प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला व आमच्या उपक्रमाची सविस्तर माहिती साधनात छापून आली. मनात अनुभवाची नोंद केली...
'केल्याने होत आहे रे!
आधि केलेचि पाहिजे।।'
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन