झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar
झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar
स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन संस्कृत सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर...? विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती? झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा धुंद परिमल आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते.
पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडावरील सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती ! आज अनेक वनस्पतींपासून औषधे उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदायी ठरली आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद शास्त्र निर्माण झाले नसते. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहाने व्याकूळ झालेल्या प्रेमींना शीतलता कोणी मिळवून दिली असती?
देवपूजेला गंध कसे मिळाले असते? झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता? झाडे नसती तर कवी मंडळींची फार अडचण झाली असती. ' त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती. झाडे नसती तर अनेकांची संकेतस्थळे हरवली असती. झाडे नसती, तर ललनांनी श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता? झाडे नसती तर गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात.
भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफाच नसल्यामुळे त्याने सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल, तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.
झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar
झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar
Tags:
मराठी निबंध लेखन