मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध ( कामगाराचे स्वप्न )
मी पाहिलेले स्वप्न
आजचा दिवस भाग्याचा ! आज अनेक वर्षांनी माझे , म्हणजे आम्हां सर्व कामगारांचे स्वप्न पूर्ण होत आहे . म्हणून आम्ही सर्व कामगार अतिशय आनंदात आहोत . एक कामगार म्हणून मी या गिरणीत कामाला लागलो . आज मी या गिरणीच्या अनेक मालकांपैकी एक मालक होणार . कारण आमच्या व्यवस्थापनाने नवीन करार करून ही गिरणी आम्हां कामगारांच्या स्वाधीन केली आहे . आमच्या गिरणीचे मालक श्री . दादासाहेब मराठे यांच्या मनाचा मोठेपणाच यातून प्रतीत होतो .
सुमारे सत्तर वर्षांपूर्वी दादासाहेबांच्या वडिलांनी ही गिरणी सुरू केली . तेव्हा माझे वडील या गिरणीत कामाला लागले . वडील निवृत्त झाले , तेव्हा मी येथे कामाला लागलो . दादासाहेब परदेशातून परतले आणि गिरणीचा कारभार त्यांच्या हातात आला . पहिल्यापासूनच येथे मालक - कामगार संबंध अतिशय सलोख्याचे , अगदी घरोब्याचे होते . दादासाहेबांनी वेळोवेळी नवीन यंत्रसामग्री आणून आपली गिरणी अदययावत ठेवली . त्यामुळे इतर कारखान्यांना , गिरण्यांना होणारा ' मंदी'चा त्रास आमच्या गिरणीला कधीच झाला नाही . आता तर आम्ही तयार केलेल्या मालाला परदेशातही प्रचंड मागणी आहे .
अशा या गिरणीतील वातावरण दूषित करायचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळींनी केला . कामगारांची संघटना आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी कामगारांना आपल्या मालकाविरुद्ध फितवले . काही उथळ प्रवृत्तीचे कामगार यासाठी तयारही झाले . पण दादासाहेबांनी सारी परिस्थिती अतिशय चाणाक्षपणे हाताळली आणि बहुसंख्य कामगारांनीही दादासाहेबांनाच साथ दिली . त्यामुळे होऊ घातलेला संप टळला . उलट त्या विघ्नसंतोषी पुढाऱ्यांनाच आमच्या गावातून तोंड काळे करावे लागले .
आता दादासाहेबांचे वय झाले आहे , त्यांचे दोन्ही मुलगे परदेशात स्थायिक झाले आहेत . तेव्हा उतारवयात आपल्या मुलाबाळांत जावे , उर्वरित आयुष्य त्यांच्या सहवासात घालवावे , असे त्यांनी ठरवले आहे . ही गिरणी मिळवण्यासाठी अनेक धनिकांनी दादासाहेबांना दामदुप्पट पैसे देऊ केले , पण त्यांनी धनाचा लोभ बाळगला नाही . कामगारांना ते स्वतःच्या कुटुंबातलेच मानत आले . तेव्हा त्यांनी ही गिरणी येथील कामगारांच्याच स्वाधीन करण्याचे ठरवले . त्यानुसार त्यांनी एक योजना आखली आणि त्या योजनेनुसार आम्ही आता या गिरणीचे मालक होणार आहोत . ही गिरणी आता कोणा एकाची नसून ' सहकारी तत्त्वावर चालवली जाणार आहे .
कामगारबंधूंनो , आपण आता मालक झालो आहोत . अनेक दिवसांचे आपले स्वप्न पूर्ण झाले आहे . पण त्याचबरोबर आपली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे . आपापसांत न भांडता एकोप्याने गिरणी चालवणे , तिचा विकास करणे हे महत्त्वाचे कार्य आहे . तेव्हा उत्तम काम करण्याचा संकल्प सोडून आपण ही गिरणी ताब्यात घेऊ या .
Tags:
मराठी निबंध लेखन