माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi
[मुद्दे : शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते पंच्याहत्तरी ओलांडली तरी तेवढीच कार्यव्यग्रता सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन – दुसऱ्यांसाठी झटणे वेळ अपुरा पडतो कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.]
माझी आजी मराठी निबंध
बाबांना 'पारखे पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी सासवन्याहून आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू,
माझी खूप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो. आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत, चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.
माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग' ! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही, हे खरंच ! आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची ' मोठी आई' बनली आहे.
आजीच्या स्वत:च्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःचे सर्व आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. ती एकभुक्त आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. आजी स्वत:साठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे.
त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वत: कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.
माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi
Tags:
मराठी निबंध लेखन