माझे बालपण मराठी निबंध - Majhe Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध - Majhe Balpan Essay in Marathi

[मुद्दे : दहावीत - आपले बालपण संपल्याची जाणीव आपण मोठे झालो आहोत. लहानपण चाळीत खरे प्रेम मिळाले -निरागसता लाभली फुलपाखरी दिवस – पुढे जीवन बदलले – यश मिळाले .

माझे बालपण मराठी निबंध Majhe Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध 


    दहावीत पदार्पण केल्यावर एक जाणीव झाली की, आपले बालपण आता संपले आहे.
मधुभावाचे ते गोड दिवस हरपले आहेत. आता आपण मोठे झालो आहोत. बालपणी हवी ती गोष्ट
हट्ट करून मिळवता येत होती. बालपणातील हे जग कसे होते?

अवनी गमली अद्भुत अभिनव ।
जिथे सुखावीण दुजा न संभव।
घरी वा दारी वात्सल्याचे मळे बहरले ।

असे कवयित्री शांता शेळके यांनी बालपणाचे वर्णन केले आहे. माझे बालपण हे असेच होते.

       आज आम्ही एका चांगल्या इमारतीत राहतो; पण माझे बालपण गेले ते आमच्या चाळीत. चाळ जुनी होती; मोठी होती; पण तेथे मला खूप सवंगडी होते. कारण त्या चाळीत आमच्या शिवाय इतर भाडेकरूही होते. सर्वांना चाळ आपलीच वाटत होती. त्यामुळे मालक व भाडेकरू असा काही भेदभाव नव्हता. एका कुटुंबासारखेच आम्ही राहत होतो.

    त्या वेळी माझे आईबाबा सरकारी नोकरीत होते. त्यांची नेहमी दूरदूरच्या गावी बदली होई. तेव्हा माझा ताबा माझ्या आजीआजोबांकडे होता. पण मी चाळीतील सर्व माणसांच्या प्रेमात एवढा गुरफटलेला होतो की, आईबाबांची अनुपस्थितीही मला जाणवत नसे.

      चाळीतील दोस्तांबरोबर मी शाळेत जात होतो. मला शिकवायला गुरुजी येत. तेव्हा माझे दोस्तही माझ्याबरोबर अभ्यासाला बसत. इतर वेळी चाळीत आम्ही भरपूर खेळत असू. टिपूर चांदण्याच्या प्रकाशात सहभोजन करणे, नाटके बसवणे या गोष्टींत आम्ही दंग असू. चाळीत लग्न-मुंजी, बारशी, आवळीभोजन असे कार्यक्रम तर चालतच. पण सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांची तर धमाल उडालेली असे !

     अशा सुंदर, गोड वातावरणात माझी चौथी पार पडली. आईबाबाही बदली संपवून परत आले. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मी पहिला आलो, तेव्हा चाळीत सर्वांना आनंद झाला. पण नंतर ती चाळ सोडून आम्ही नवीन जागेत राहायला गेलो. माझी शाळाही बदलली. पहिले काही दिवस मी बेचैन होतो, अस्वस्थ होतो. चाळ, चाळीतील मित्र यांची मला आठवण येत होती. पुढे नव्या शाळेत व नव्या मित्रांत हळूहळू गुंतत गेलो. पाचवीपासून दहावीपर्यंत मी अनेक नव्या गोष्टी शिकलो, यश मिळवीत गेलो. पुढे पुढे जात राहिलो. दरम्यान आईबाबांना वरच्या पदावर बढती मिळाली. आज त्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण बालपण डोळ्यांपुढे साकार झाले. आता दहावीची परीक्षा झाली की, माझ्या या साऱ्या बालमित्रांना मी एकत्र करीन आणि एक छान 'गेट टूगेदर' साजरे करीन !

माझे बालपण मराठी निबंध - Majhe Balpan Essay in Marathi

मित्रांनो  आज आपण  आज आपण या पोस्टमध्ये माझे बालपण या विषयी निबंध लिहिला आहेत हा निबंध तुम्हाला कसा वाटला किंवा ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कोणत्याही प्रकारचे विविध निबंध लागत असतील तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या साठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू  धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post