माझे आजोबा मराठी निबंध | My Grandfather Essay in Marathi nibhand
माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न अशी मूर्ती; ते नेहमी आनंदी असतात. कधी कुरकुर नाही की कधी चिडचिड नाही. मी तरी त्यांना अजूनपर्यंत कधी चिडचिड करताना पाहिलेले नाही. ते सदोदित हास्यविनोद करीत वावरतात. यामुळे सगळ्यांना त्यांचा सहवास आवडतो. त्यांच्या स्नेहयांचा मोठा गोतावळा आहे. आमच्या सर्व नातेवाईकांनाही आजोबा खूप आवडतात. आजोबा सर्वांची नेहमी अगत्याने चौकशी करतात. सगळ्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे आमच्याकडे पाहुण्यांची व मित्रमंडळींची सतत वर्दळ असते. आजोबा दिसले की, सगळ्यांना आनंद होतो.
माझ्या आजोबांना नीटनेटकेपणा व स्वच्छता यांची भारी आवड आहे. हा गुण तर सगळ्यांनी त्यांच्याकडून घ्यावा असा आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळी नीटनेटकेपणाने होते. प्रथम खिडक्या, कठडे, खुा-टेबले, कपाट यांच्यावरची धूळ ते पुसून काढतात. सुमारे अर्धा तास त्यांची ही साफसफाई चालते. मग ते त्यांनी आवडीने लावलेल्या रोपट्यांकडे वळतात. इथेही त्यांच्या स्वभावातील नीटनेटकेपणा व प्रेमळपणा दिसून येतो. प्रथम ते मऊ व ओलसर फडक्याने रोपट्याची पाने हळुवारपणे पुसून घेताना; ओल्या फडक्याने कुंडी पुसून घेतात आणि मग रोपट्यांना पाणी घालतात. आजोबांच्या प्रेमळ स्पर्शाने जणू रोपटी टवटवीत बनतात.
साफसफाई झाली की, ते आंघोळ करतात; न्याहरी घेतात आणि सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडतात. तासाभराने परत आले की, पुन्हा एकदा चहा घेतल्यावर त्यांच्याआवडीच्या दिनक्रमाला सुरुवात करतात. तो म्हणजे वाचनाचा. ते तासभर तरी वर्तमानपत्रे वाचतात. त्यांना वर्तमानपत्रे वाचायला खूप आवडतात. म्हणून आम्ही तीन वर्तमानपत्रे घेतो. एक इंग्रजी आणि दोन मराठी, ते वाचत असताना आजूबाजूला कोणी असले, तर त्यांना ते
वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या ऐकवतात. इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना ते न चुकता शब्दकोश घेऊन बसतात. एखादा शब्द अडला, तर कंटाळा न करता शब्दकोशात शब्द शोधतात. मी बाजूला असलो, तर त्यांना मदत हवी असल्याचा आव आणून मला शब्द शोधायला लावतात. त्यांच्या या सवयीचा मला इतका फायदा झाला आहे की, वर्गात माझा इंग्रजी निबंध सगळयांपेक्षा चांगला असतो.
संध्याकाळी फेरफटका आटोपल्यावर ते माझ्याशी गप्पा मारायला बसतात. माझी दिवसभराची सगळी हकिकत विचारून घेतात. शाळेत कोणकोणत्या विषयांचे तास झाले, कोणी काही प्रश्न विचारले का, शिकवलेल्या भागातील काय जास्त आवडले, काय कठीण वाटले- असे सर्व काही विचारून घेतात. आता माझ्या लक्षात येते की, त्यांच्या या सवयीमुळे त्या त्या दिवशी शिकवलेल्या अभ्यासाची नकळत उजळणी होऊन गेली आहे.
मी अभ्यासाला बसलो की, त्यांचे माझ्याकडे बारीक लक्ष असते. मी कसा बसतो, पेन कसे धरतो, पुस्तक कसे धरतो, वही कशी ठेवतो या गोष्टी ते बारकाईने न्याहाळतात. मला पाठांतर करताना खूप मदत करतात, ते दररोज, आगदी आता दहावीच्या वर्षीही पाठ्यपुस्तकातील थोडा तरी मजकूर मला मोठ्याने वाचायला लावतात. मात्र हे सर्व काही कधीही न रागावता! सगळ्या बाबतीत पद्धतशीरपणा व नीटनेटकेपणा असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांची ही सवय हळूहळू माझ्याही अंगी बाणली आहे.
मी माझ्या वयांतील सर्व लेखन मन लावून चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या बाई माझ्या लेखनाची नेहमी स्तुती करतात. मी याचे सर्व श्रेय माझ्या आजोबांना देतो. मनात चांगले विचार बाळगावेत, त्यानुसार चांगले वागावे आणि हे सर्व नियमितपणेकरावे, असे त्यांचे सर्वांना सांगणे असते. माझे आजोबा स्वतः तसेच वागतात. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले', असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. ज्यांची पावले वंदावीत असेच माझे आजोबा आहेत.
माझे आजोबा मराठी निबंध | My Grandfather Essay in Marathi nibhand
Tags:
मराठी निबंध लेखन