marathi bodh katha - माणुसकी
संस्कृतचे महाकवी माघ निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत. त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत. एकदा कवीराज माघ आपल्या घरी शिशुपाल वध या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली.
त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले. त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला,'' कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्टीने खूप मोठी असणार आहे.'' महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना.
घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या माणसाला देण्याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवान असे काय शिल्लक राहणार. जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले. पत्नीच्या हातात सोन्यांचे कंकण होते. त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकले.
गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कविराजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाली, ''मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस.'' या दांपत्याच्या दानी वृत्तीला गरीबाने साष्टांग नमस्कार केला.
मराठी बोधकथा तात्पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.
marathi bodh katha-वाईट सवयींचा त्याग
एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन.
त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला.
मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.'' मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणेलक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.
मराठी बोधकथा तात्पर्य - वाईट सवयी बाळवण्यापूर्वीच त्यांचे निर्मूलन केले पाहिजे
marathi bodh katha-धनाचा विनियोग
एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.'' नाग म्हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.
'' मग कोल्हा पुन्हा म्हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्हणाला,'' कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.
'' हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,'' मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''
मराठी बोधकथा तात्पर्य- ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.
marathi bodh katha-सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत.
गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला.
त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्हणाले,''मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे.'' लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.
भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेट म्हणाले,'' भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.''
मराठी बोधकथा तात्पर्य - मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा
marathi bodh katha-जगण्याचे भान
एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली.
कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले.
उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'
मराठी बोधकथा तात्पर्य - व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.
marathi bodh katha-गुरु कासव
कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्या शेतात छोटीमोठी कामे करून स्वत:ची गुजराण करत असे. आपल्या गरजा त्याने खूपच मर्यादित ठेवल्या असल्याने त्याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्याने एक कासव पाळले होते आणि त्या कासवावर त्याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्या कासवाशी संवाद साधत असे.
आजूबाजूचे लोक त्याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्य त्याला भेटण्यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर त्याने त्या कासवाला पाहिले व तो मनुष्य म्हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्या कासवाला.'' त्याच्या बोलण्याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्वप्नातसुद्धा विचारत आणत नाही.
ते कासव माझ्या गुरुस्थानी आहे म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्याला हे शिकवते की त्याच्यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्या मनाला वाईट गोष्टींपासून अंग चोरण्याचा प्रयत्न केला तर मानवाचे त्यात भले आहे.''
मराठी बोधकथा तात्पर्य - विश्वातील प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवण देतच असतो.
marathi bodh katha-राजा आणि संत
एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही.
राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस.
तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.
मराठी बोधकथा तात्पर्य: चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.
marathi bodh katha-चांगलें विचार
एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावा शेजारी खूप मोठे जंगल होते.त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे.अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे. त्यामुळे हे जंगल निर्जन होते.जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे.जंगली प्राण्यामुळे लोकांना आज पर्यन्त कधीच त्रास झाला नव्हता.
एकदा एक गरीब माणूस जंगलातून फिरत चालला होता.जंगलात दूरवर आणि त्याच्या सोबत कोणीही नव्हते.बरेच अंतर पार केले असताना तो खूप थकला होता . आणि त्याला खूप तहान लागली होती आणि भूकही लागली होती , एक डेरेदार झाड पाहून तो त्याच्या खाली बसला आणि विचार करू लागला कि आपल्याला इथे कोणी मिष्टान्न भोजन व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल ? योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष .
त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली . आणि त्याच्या पंच पक्वानाचे जेवण प्रकट झाले. त्या माणसाला वाटले कि बहुधा देवच प्रसन्न झाला असावा. त्याने प्रार्थना केली कि मला पोते भरून मोहरा मिळाव्यात म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल . तीही इच्छा लगेच पूर्ण झाली . इतक्या मोहरा त्याने आयुष्यात पाहिल्याही नव्हत्या . पण आता त्याला भीती वाटू लागली .
या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे ? ते धन तर लुटून नेतीलच , पण आपल्यालाही ठार मारतील . हे मनात येताच तिथे चोर आले . आणि त्यांनी मोहरांची पिशवी उचलली आणि त्या गरीब माणसाला ठारही केले . कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळल्याने तो हकनाक मरण पावला . या बद्दल आम्हला प्रतिक्रिया नक्की द्या.
मराठी बोधकथा तात्पर्य - आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचा जरूर विचार करावा.एखादी संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये.कल्पवृक्ष आणि सामर्थ्याची कल्पनाच नसल्याने कार्यकर्ते प्रत्येका ने असे दरिद्री संकल्प करू नये.
marathi bodh katha-गरीब शेतकरी
एक गरीब शेतकरी होता.त्याचा कडे कसन्यासाठी थोडीच जमीन होती.तय जमिनीत तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते. कमी जमीन असल्यामुळे त्याचा फक्त प्राथमिक गरजा भगत असे.या कारणामुळे तो नेहमी दुःखी असे.त्यास वाटे की आपल्याला ही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी.त्यासाठी तो सारखे म्हणत असे कि , “ मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईन.तो नेहमी यांसाठी देवाकडे मागणी करत असे.देवाने ही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले.
" एक दिवस तो सकाळी जागा झाला , तो समोर देवाचेच दर्शन झाले . त्याला खूप आनंद झाला ,आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले,त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली कि देवा मला भरपूर जमीन मिळवून दे . देवाने सांगितले " तू आता पळायला सुरवात कर . सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुझी होईल.असे बोलून देव अदृश्य झाले.शेतकऱ्यास खूप आनंद झाला.
त्याने देवाने सांगितल्या प्रमाणे धावण्यास सुरवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हती त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला . पण दिवसभरात अविरत धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता कि तिथे पोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला . ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाला ,
" तो आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्याच जमिनीची त्याची वास्तविक गरज होती .अश्या प्रकारे शेतकरी ला जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने गेला. देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवीय का जमीन,तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करेन. आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईल.देव प्रसन्न होऊन अदृश्य झाला.
मराठी बोधकथा तात्पर्य: अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो . अजून एक अर्थ लावता येईल अति तेथे माती
Khupach sundar marathi bodha katha ahat
ReplyDelete