भक्त प्रल्हादची कथा - The story of Pralhad | Marathi Goshti - मराठी गोष्टी

भक्त प्रल्हादची कथा - The story of Pralhad 

होळीच्या सणाची संकल्पना भक्त प्रल्हादाच्या कथेत दडलेली आहे. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा राक्षस कुळात होऊन गेला. त्याने घोर तपश्चर्या करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेतले व ब्रह्मदेवाकडे वर मागितला, "देवा, मला कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मरण येऊ नये, ना मनुष्याकडून, ना देवाकडून, ना दानवाकडून, ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर, ना आकाशात ना धरतीवर!"

ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. तेव्हा या वरदानाने आपण अमर झालोअसे त्याला वाटू लागले. आपण सर्वशक्तीमान असून कोणीही आपल्याला मारु शकणार नाही, असा त्याचा समन झाला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून लोकांनी ईश्वराची पूजा करण्याऐवजी आपलीच पूजा करावी असे फर्मान त्याने काढले. ईश्वराची भक्ती करणाऱ्याला चाबकाने फोडून काढले जात असे. 

भक्त प्रल्हादची कथा - The story of Pralhad
भक्त प्रल्हादची कथा

भयभीत झालेली प्रजा हिरण्यकश्यपूचा नाईलाजाने जयजयकार करी. हिरण्यकश्यपुला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. तो लहानपणापासूनच 'नारायण नारायण' असा जप करी. सुरवातीला हिरण्यकश्यपूने त्याला समजावून सांगितले, की तू नारायणाचा जप करु नकोस. - देवाचे नाव आपल्या राज्यात कोणी घेतले तर त्याला राजद्रोही समजून कडक शासन करण्यात येईल. 

परंतु प्रल्हादावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने भगवद्भक्ती सोडली नाही. पूर्वजन्मी त्याने ईश्वराची अलोट भक्ती केल्यामुळे त्याला भगवंताच्या नामाची गोडी लागलेली होती. आपण श्रेष्ठ असूनही आपला मुलगा ईश्वराची भक्ती करतो हे अभिमानी हिरण्यकश्यपूला सहन झाले नाही. हा मुलगा नसून आपला वैरी आहे. त्याने सैनिकांना आदेश दिला, 

"प्रल्हादाला ठार करा” सैनिकांनी प्रल्हादाला उंच कड्यावरुन ढकलले, उकळत्या तेलात टाकले, हत्तीच्या पायी दिले, नाना प्रकारे मारण्याचा प्रयत्न करुनही प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. प्रत्येकवेळी ईश्वराने त्याचे रक्षण केले. अनेक प्रयत्न करुनही प्रल्हादाला ठार मारु न शकल्यामुळे हिरण्यकश्यपू चितित झाला. त्याने आपली बहीण होलीका हिला बोलावून घेतले. 

होलिकेला अग्निपासून भय नव्हते. कारण तिलाही तसे वरदान प्राप्त होते. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले. बाजूने लाकडे रचून अग्नि पेटविण्यात आला. प्रल्हादाने नामस्मरण करताच अग्नी शांत झाला. प्रल्हादाला कोणतीही इजा झाली नाही. अभिमानी होलिका मात्र अग्नित जळून खाक झाली. सत्य आणि दृढनिष्ठेचा विजय झाला. 

आसुरी आणि अहंकारी वृत्तीचा पराजय झाला. परमपिता परमात्म्यात जो दृढ निष्ठा बाळगतो, तेव्हा संपूर्ण प्रकृती सुद्धा त्याची दासी होते. त्याला अनुकूल बनते. इकडे क्रोधाग्नीने जळत असलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, "कुठे आहे तुझा नारायण?"

प्रल्हाद म्हणाला, "जसा लाकडात अग्नी व्याप्त आहे, तिळात तेल आहे तसा माझा नारायण संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सर्व प्राण्यांचा पोषक तो परमात्मा आहे, जो सर्व नरनारीमध्ये वास करतो; त्याचेच नाव नारायण आहे. पिताश्री, तुम्हीही त्या नारायणाला शरण जावे.' हिरण्यकश्यपू गर्जत म्हणाला, "तुझा नारायण सर्वत्र व्याप्त आहे; मग या खांबातही आहे का?" प्रल्हाद म्हणाला, "होय पिताश्री, ईश्वर नाही अशी कोणतीही जागा नाही.,,

"अस्सं काय?" असे म्हणून हिरण्यकश्यपूने रागाने खांबाला जोरात लाथ मारली. त्याबरोबर काडकाड आवाज करीत खांब दुभंगला. खांबातून भगवंत नृसिंह रुपात प्रगट झाले. त्यांचे ते आक्राळ-विक्राळ रुप पाहून हिरण्यकश्यपू थरथर कापू लागला. भगवंताने त्याला फरफटत दरवाजात आणले. नृसिंहरुप भगवान म्हणाले. "अत्याचारी, तुझी सर्व वरदाने सुरक्षित असूनही तुझा मृत्यू अटळ आहे."

 भक्तराज प्रल्हादाला त्रास देणाऱ्या हिरण्यकश्यपूला भगवंताने आपल्या मांडीवर घेऊन तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला. परंतु भगवंताचा क्रोध शांत झाला नाही त्यांना शांत करण्यासाठी देवी-देवतांनी भगवंताची स्तुती केली. त्यानेही भगवंत शांत झाले नाहीत. मग देवांनी प्रल्हादाला पुढे केले. आपल्या प्रिय भक्ताला पाहून भगवंताचा आवेश शांत झाला. भगवान नृसिंह प्रल्हादास म्हणाले, "वत्सा! बरदान माग, तुला हवे ते देईन.' प्रल्हाद हात जोडून विनम्र भावाने म्हणाला, 

"हे भगवंता, भक्त आणि साधक केवळ आपले स्मरण करुन स्वत:चे भाग्य उज्ज्वल करतात तर मग मला अन्य वस्तू मागण्याची आवश्यकताच काय? माझ्या मनात आपल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा निर्माण होऊ नये. साक्षात परब्रह्माला सोडून त्यांच्याकडे दुसरे काही मागणे हा परब्रह्माचा अपमान नाही काय ? हे प्रभू! माझ्या मनात कधीही नश्वर वासना येक नयेत.

मला आपली भक्ती व दृढ प्रीती मिळावा", अतिशय संतुष्ट होत भगवान नृसिंहानी प्रल्हादाच्या मस्तकाचे चुंबन घेतले. भगवान म्हणाले, "वत्सा! मला ठाऊक आहे, तुला भोगाची इच्छा नाही. ज्याने एकदा जरी माझ्या स्वरुपाचे ज्ञान व ध्यान प्राप्त केले, त्याला सर्व भोग तुच्छ वाटतात, परंतु तुझी इच्छा नसतांनाही, शुभकर्माचे फळ म्हणून तू राजा होऊन राज्य करशील. 

सर्व सुखं, राज्य-वैभव, प्राप्त होऊनही तू त्यात गुरफटणार नाहीस. तू योग्यप्रमाणे निर्लेप राहशील. तुला नित्य सत्संग मिळेल आणि शेवटी तू सत्पुरुषाच्या गतीला प्राप्त होशील." दैत्यकुळात जन्मलेल्या भक्त प्रल्हादाची निष्ठा आणि भक्ती पाहून देवीदेवताही त्याची स्तुती करु लागल्या. होळीचा उत्सव आपल्याला हाच संदेश दोतो की आपणही आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांचा धैर्याने सामना करावा आणि कितीही बिकट परिस्थिती असली तरी प्रल्हादाप्रमाणे आपली श्रद्धा आणि विश्वास दृढ ठेवावा. 

होळी म्हणजे केवळ गोवऱ्या आणि लाकडाचा ढीग जाळण्याचा उत्सव नसून चित्ताची दुर्बलता दूर करण्याचा व मनाच्या मलीन वासनांचे दहन करण्याचा पवित्र दिवस आहे. परमात्म्यावर श्रद्धा ठेवून सहानुभूती, निर्भयता, स्वधर्मपालन, करुणा, दया, अहिंसा, इ. दैवी गुणांचा आपल्या जीवनात विकास केला पाहिजे. विघ्न, बाधा, राग, शोक, भयदुःख याने व्यथित न होता सदैव चैतन्यमय सर्वव्यापी निराकार ईश्वराच्या नामात मग्न राहावे. 

वाईट विचार, वासना आणि विकार यांचं दहन करुन सद्गुणांचा विकास करुन त्यांची सप्तरंगी उधळण करावी. प्रेम-भक्तीचा रंग आपल्या जीवनात उतरवावा. या दिवशी वाईट शब्द उच्चारणे, शरीराला घातक असणाऱ्या रंगांचे ण फुगे मारणे या गोष्टी निषिद्ध आहेत. त्या करुन आपण दुर्गुणांची होळी नर करण्याऐवजी सद्गुणांचीच होळी करतो. त्यामुळे आपल्या जीवनात आनंद गत येत नाही. यासाठी भक्त प्रल्हादाची कथा आठवावी. ईश्वरावर श्रद्धा त ठेवून दैवी गुण धारण केले तर आपले जीवन सुखी होईल. 

भक्त प्रल्हादची कथा - The story of Pralhad 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post