अटळ पद कथा
उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एकीचं नाव सुरुचि आणि दुसरीचं नाव सुनीती. त्या राजाला दोन मुलगे होते. सुरुचिच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनितीच्या मुलाचं होतं ध्रुव. दोघंही भावंडं एकत्र खेळत. राजाचं दोघा मुलांवर सारखंच प्रेम होतं. एके दिवशी उत्तम आणि ध्रुव खेळता-खेळता धावत येऊन राजाच्या मांडीवर बसले. उत्तमची आई सुरुचि राजाच्या जवळच बसलेली होती. राजा दोन्ही मुलांना प्रेमाने कुरवाळू लागला. राणी सुरुचिला हे काही सहन झालं नाही. रागारागाने ध्रुवाला राजाच्या मांडीवरुन खाली ढकलत ती म्हणाली, "महाराजांच्या मांडीवर माझा उत्तम बसणार. यापुढे तू बसायचे नाही.
भिकारडा कुठला!" लहानग्या ध्रुवाला अतिशय वाईट वाटलं. रडत-रडत तो आपल्या आईकडे गेला. राणी सुरुचि राजाची आवडती असल्याने तिच्यापुढे राजा काही बोलू शकला नाही. ध्रुवाला त्याची आई सुनीती समजावत म्हणाली, "बाळ, आपल्याला देवाने जसे ठेवले तसेच राहावे. ईश्वराच्या इच्छेतच समाधान मानावं." आईच्या समजावण्यानेही त्याचे समाधान झालं नाही. तो म्हणाला, "मला आत्ताच्या आत्ता देवाकडे जायचे आहे.”
आई समजूत घालण्याच्या उद्देशाने म्हणाली, "बाळ, देव खूप लांब जंगलात राहतो. तो तुला कसा भेटणार? तिथं वाघ, सिंहासारखे मोठ मोठे हिंस्त्र प्राणी राहतात. बाळ ध्रुवाने मनाशी निश्चय केला आणि तो तडक राजवाड्याबाहेर पडला. आईने सांगितल्याप्रमाणे देव खरेच जंगलात असेल म्हणून तो दाट जंगलात तहान-भूक विसरुन चालू लागला. एका झाडाखाली बसून तो देवाची प्रार्थना करु लागला.
अन्न पाण्यावाचून देवाच्या भेटीसाठी तसाच बसून राहिला. अंग संग असणाऱ्या सर्वव्यापी ईश्वराने त्याचे थंडी, ऊन, वाऱ्यापासून रक्षण केले. थोड्या दिवसात कंटाळून ध्रुव घरी परत निघून जाईल असे देवाला वाटले. पण त्याचा दृढ निश्चय पाहून देवाला मात्र मनुष्य रुपात यावं लागलं. साकार रुपात आलेला ईश्वर ध्रुवाला म्हणाला, "बाळ ध्रुवा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय पाहिजे ते माग.
सावत्र आईने दिलेल्या वागणुकीने दुखावलेला ध्रुव म्हणाला, "देवा, मला कुणीही उठवणार नाही अशी अढळ जागा द्या!' ईश्वराच्या कृपेने नारदमुनींकडून त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. ध्रवाला अढळपद प्राप्त झाले. ध्रुवबाळ घरी आला. त्याच्यात अमूलाग्र बदल झाला होता. त्याचे मन विशाल बनले होते. प्रेम, नम्रता, सहनशीलता, परोपकाराने त्याचे हृदय भरले होते. आपल्या सद्गुणांमुळे तो सर्वांना प्रिय झाला.
प्रजेचा लाडका, सद्गुणी राजपुत्र असल्यामुळे पुढे राजाने त्याला गादीवर बसवले. ध्रुवाने न्यायाने राज्य केले. प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. प्रजेची निस्वार्थ सेवा करुन त्याने प्रत्येकाच्या हृदयात असे स्थान मिळवले
की जे कोणीही काढू शकत नव्हते. प्रजेचा हा आवडता राजा अनेक वर्षे राज्य करुन या निराकार ईश्वराच्या कुशित स्थिरावला. त्या विशाल ब्रह्मांडात त्याला कोणीही उठवू शकणार नव्हते.
ज्याने या ईश्वराचा बोध करुन घेतला, आपल्या आत्मस्वरुपाचे ज्ञान घेतले; त्या प्रत्येकाला ध्रुवासारखे मुक्तीचे अढळपद प्राप्त होते. अशा या बालभक्त ध्रुवाची आठवण आपल्याला कायम रहावी व त्याच्याकडून भक्तीची शिकवण मिळावी म्हणून आपण आकाशातील एका. स्थिर ताऱ्याला ध्रुवाचे नाव दिले आहे. आजही ध्रुव बाळाची कथा घराघरात गायली जाते. दृढनिश्चय आणि ईश्वरभेटीची तळमळ ही बालपणातच ज्याच्याकडे असते त्याला ईश्वराची कृपादृष्टी लाभते.
मराठी बोधकथा लहान | अटळ पद कथा | मराठी बोधकथा
Tags:
मराठी गोष्टी