आमचे श्रमदान मराठी निबंध

आमचे श्रमदान मराठी निबंध

आमचे श्रमदान मराठी निबंध

आमचे श्रमदान मराठी निबंध
समाजसेवेच्या तासाला गुरुजींनी सांगितले , " आपण प्रत्येकजण समाजाचे ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या रूपाने फेडलेच पाहिजे . " बालवीर संघटनेने आम्हांला शिकवले की , प्रत्येक बालवीराने रोज काहीतरी सत्कृत्य केलेच पाहिजे . आमच्या अभ्यासक्रमात ' समाजसेवा ' हा विषयही नेमलेला आहेच . तेव्हापासून सतत माझ्या मनात येई की , आपण याबाबत काय करू शकतो ? माझ्या इच्छेनुसार तशी संधी चालून आली . आमच्या शहरापासून जवळच आदिवासींचा एक पाडा आहे . एका सामाजिक संस्थेने त्या वस्तीत एक शाळा चालवली आहे . या शाळेची इमारत बांधली जात आहे .
 विशेष गोष्ट म्हणजे शहरातील काही सेवाभावी लोक ठरवून त्या वस्तीत जातात आणि बांधकामाच्या कामात मदत करतात . आमच्या गुरुजींनीही दोन दिवसांच्या कामाची जबाबदारी स्वीकारली . राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसमधून आम्ही शंभर विदयार्थी व सहा शिक्षक तेथे गेलो . त्या इमारतीचे बांधकाम एका निष्णात स्थापत्यविशारदाच्या मार्गदर्शनाखाली चालू होते . आम्ही त्या वस्तीवर पोहोचलो , तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते . लगेच कामाची वाटणी करण्यात आली . त्यानुसार आमचे गट पाडण्यात आले . 

आम्हांला काम शिकवण्यासाठी सहा गवंडीही होते . आम्ही विटा घमेल्यांत भरून त्यांना नेऊन देत होतो . विटा निवडणे , त्या भिजवणे , त्या घमेल्यांत भरणे , कामाच्या जागेवर नेऊन देणे , रिकामी घमेली परत आणणे ही कामे काही गटांकडे होती , तर काही जण रेती , सिमेंट यांचे मिश्रण करून त्या कारागिरांना देत होते . मात्र आम्हांला शारीरिक श्रमाचे काम करण्याची सवय नसल्याने लवकरच आम्ही थकून गेलो . काहीजणांच्या हातून घमेली पडली , कुणाला लागलेही ; पण आता माघार घ्यायची नाही , श्रम करायचेच या निर्धाराने सर्व विदयार्थी काम करीत होते . कुणीतरी गाणी म्हणायला सुरुवात केली आणि मग काम झपाट्याने होऊ लागले . त्या गवंडी कामगारांचे भिंत बांधण्याचे , ओळंबा लावण्याचे काम आम्ही करून पाहिले . 

पण ते कुठले जमायला ? ' जेनु काम तेनु थाय , बिजा करे सो गोता खाय ' असे म्हणतात ते उगाच नाही ! अंगमेहनतीचे काम केल्यामुळे सपाटून भूक लागली . झुणका - भाकरीचा मस्त बेत होता . त्यावर आम्ही ताव मारला . रात्री शेकोटीभोवती बसलो असताना आदिवासी मुलांनी त्यांची गाणी गाऊन दाखवली . दोन दिवस केव्हा संपले ते कळलेच नाही . परतताना गुरुजी म्हणाले , “ मुलांनो , तुम्ही आज श्रमदान केलेत , समयदान केलेत . हीच सवय नेहमी ठेवा म्हणजे तुम्ही देशाचे उत्तम नागरिक व्हाल . ' ' गुरुजींचा उपदेश मनात घोळवतच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post