माझे पहिले भाषण मराठी निबंध

माझे पहिले भाषण मराठी निबंध

माझे पहिले भाषण मराठी निबंध
माझे पहिले भाषण
माझे पहिले भाषण
आमच्या शाळेत विविध स्पर्धा नेहमी होत असतात . त्याप्रमाणे आंतरशालेय स्पर्धांचीही रेलचेल असते . माझे अनेक दोस्त वैयक्तिक पारितोषिके , सांघिक ढाली मिळवून आणत असतात . त्यायोगे त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढत असतो . या साऱ्या स्पर्धांच्या धामधुमीत माझे काम असते केवळ श्रोत्याचे आणि टाळ्या वाजवण्याचे . खरे तर मी कधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता आणि कधी घेईन असे वाटलेही नव्हते ; पण स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे आणि संपूर्ण वर्गाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी भाषणाला उभा राहिलो आणि चक्क मी माझे पहिले भाषण ठोकले . 

त्याचे असे झाले की , आमच्या इयत्ता नववीच्या दोन तुकड्यांत , म्हणजे ' अ ' आणि ' ब ' यांमध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी चुरस असते . अभ्यास , खेळ , इतर कला स्पर्धा , अभिनय , वक्तृत्व अशा स्पर्धांत ही चढाओढ चालू असते आणि अशी चढाओढ लावण्यात आमच्या शिक्षकांनाही विशेष रस वाटत असावा ! एकदा आमच्या वर्गातील खंदे वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले विदयार्थी बाहेरगावी वक्तृत्व स्पर्धेला गेले होते . नेमक्या त्याच काळात वक्तृत्वाच्या आंतरवर्गीय स्पर्धा जाहीर झाल्या . सरांनी मग मलाच अकल्पितपणे स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला . त्यामुळे या वादविवादाच्या लढाईत आमच्या वर्गाची खिंड लढवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली .

आजवर मी सभेत कधीच भाषण केले नव्हते . परंतु अभ्यास आणि वाचन बरे असल्याने भाषणाचे मुद्दे काढणे मला सहज शक्य झाले . मी भाषणाची व्यवस्थित तयारी केली . पण शे - दोनशे मुलांसमोर उभे राहून भाषण ठोकणे या कल्पनेनेच माझे पाय थरथरू लागले . अशा मन : स्थितीतच मी भाषणासाठी उभा राहिलो . भाषणाचा विषय होता- ' आम्ही आमच्या वाडवडलांपेक्षा सुखी आहोत काय ? ' खच्चून भरलेल्या त्या सभागृहात व्यासपीठावर उभा राहिलो मात्र , सर्व सभागृहच आपल्याभोवती फिरत आहे , असा मला भास होऊ लागला . 

घशाला कोरड पडली . क्षणभर आवाज फुटेना ; पण त्याच क्षणी निराश झालेल्या आपल्या वर्गमित्रांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले आणि मग मात्र मी निर्धारपूर्वक माझ्या भाषणाला सुरुवात केली . एकापाठोपाठ एक मुद्दे सुचत गेले . आजच्या पिढीच्या कर्तृत्वाच्या कथा सांगून आम्ही आमच्या वाडवडलांपेक्षा सुखी आहोत , हाच आशावादी दृष्टिकोन मी मांडला होता . माझ्यापूर्वी बोललेल्या वक्त्यांचे मुद्दे सुद्धा मी खोडून काढले . पाच मिनिटे केव्हा संपली ते कळलेच नाही . समोरील मित्रांच्या टाळ्यांच्या कटकडाटाने मी भानावर आलो . आणि काय आश्चर्य ! या माझ्या पहिल्याच भाषणात मी बक्षीसपात्र वक्ता ठरलो .

माझे पहिले भाषण मराठी निबंध



Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post