माझा गाव ,आदर्श गाव [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

माझा गाव ,आदर्श गाव [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

माझा गाव ,आदर्श गाव [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

आज मी माझ्या गावाची हकिकत सांगणार आहे . त्याचे कारणही महत्त्वाचे आहे . नुकताच शासनाकडून ' निर्मल ग्राम ' हा गौरव पुरस्कार माझ्या गावाला मिळाला आहे . पुरस्कारापोटी दोन लाख रुपये मिळाले . हजारो गावांत माझा गाव ' निर्मल ग्राम ' ठरला याचा मला मोठा अभिमान वाटतो ..
सह्याद्रीच्या कुशीतील अणूर हे एक खेडे . जमीन खडकाळ , बरड . फारशी सुपीक नाही . पाण्याची तर नेहमीचीच ओरड . गावात साधारण सहाशे - सातशेपर्यंतची वस्ती . गावात शिक्षणाचे प्रमाण कमी . सहकार्य जवळजवळ नाहीच . स्वच्छता बाळगण्याची वृत्ती नाही .
  
    गाव एकंदरीत बकाल बनला होता , अशा या गावाचे एवढे परिवर्तन कसे झाले ? गावाचेच सुदैव म्हणायचे ! गावातला रघू शहरातून गावाकडे परत आला ; म्हणून हे सारे घडले ! रघू शहरात नोकरी करीत होता . पण त्याची प्रकृती ठीक राहीना म्हणून तो गावाकडे परत आला . रघूला बरे वाटले आणि त्याने गावातच राहायचे ठरवले . रघूला स्वस्थ बसवेना . त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले . तो गावात नवा असल्याने त्याचे गावातील कोणाशीही भांडण नव्हते . त्यामुळे त्याच्या विनंतीवरून सगळे एकत्र जमले . 

रघूने स्वच्छ सुंदर गावाची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली . बहुसंख्य लोकांनी रघूची टिंगल केली . रघूने कामाला सुरुवात केली . प्रथम त्याने प्रत्येक घराला संडास बांधायची कल्पना मांडली . गावकऱ्यांबरोबर तो स्वतः काम करीत असे . गावाची दुसरी अडचण होती ती पाण्याची . गावातल्या महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागत असे . रघूने यासंबंधी खूप विचार केला . काही जाणकारांशी चर्चा केली . त्याने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन विहिरी खणल्या . 

काही बोअर विहिरी काढल्या आणि जो काही तुटपुंजा पाऊस पडतो त्याचे पाणी अडवण्याचे उपाय सुचवले . बघता बघता गावाचा कायापालट होऊ लागला . गोबर गॅस ओल्या कचऱ्यापासून खत असे काही प्रकल्प यशस्वी झाले . रघूने पारंपरिक शेतीला वनशेतीची जोड दिली . गावाची आर्थिक स्थिती सुधारली . गावातील भांडणे संपली . गावकरी गुण्यागोविंदाने राहू लागले . एकमेकांच्या मदतीला जाऊ लागले . गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाली . लघुउद्योग सुरू झाले . लोक विधायक कामात गुंतले . बघता बघता माझा गाव निर्मळ झाला . साऱ्या महाराष्ट्रात ' निर्मल ग्राम ' हा किताब मिळवणारा माझा गाव आज साऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे . अशी आहे आमच्या आदर्श गावाची कथा .

माझा गाव ,आदर्श गाव [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post