माझी लढाई मराठी निबंध | Prasang Lekhan In Marathi

प्रश्न . माझी लढाई या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा :

  1.  उपचार व लढाई जिंकणे 
  2. अपघात व उपचार  
  3. मित्र - मैत्रिणी , कुटुंब यांची साथसोबत 
  4. परिस्थितीशी लढण्याची मानसिक तयारी

माझी लढाई मराठी निबंध | Prasang Lekhan In Marathi
माझी लढाई मराठी निबंध | Prasang Lekhan In Marathi 

सकाळी अंथरुणात मी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहतो , तर औषधे , सलाईन , नर्स , डॉक्टर , चिंताक्रांत आईबाबा असे सारे दिसले . मला काही कळेना ! आई सारखी विचारत होती- ' मी कोण आहे ? मला ओळखतोस ना ?

 माझ्या लक्षात आले आई असे का विचारत होती ते . फुटबॉल खेळताना मित्राच्या पायात पाय अडकून मैदानावर पडलो होतो ; तेव्हापासून मी बेशुद्धच होतो आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो . शुद्धीवर आलो तेव्हा लक्षात आले डावा पाय आणि डावा हात प्लॅस्टरमध्ये आहे . पायाचे ऑपरेशन करावे लागले होते . ' पुढील सहा महिने मैदानावर खेळता येणार नाही , ' डॉक्टरांचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मनाशी ठरवले - आता या परिस्थितीशी लढायचे आणि जिंकायचेही ! आईबाबांनी माझी समजूत घालण्यापूर्वीच मी स्वत : ला सावरले . त्यांनाही माझ्या या वागण्याचे समाधान वाटले . 

मला माझी शाळा , वर्ग , मैदानावरचे स्वच्छंदी धावणे हे सगळे घरी बसल्यावर आठवू लागले . सहली , ट्रेक या सगळ्या गोष्टी आठवणींची शिदोरी बनले होते .शाळेतील मी फुटबॉल चॅम्पियन ! सर्वात अधिक गोल करणारा विक्रमवीर ! सध्या फक्त आठवणींवर दिवस घालवत होतो . 

दोन दिवसांनी माझ्या मित्रांनी माझ्या घराचे दार ठोठावले . बास्केटबॉल , कॅरम बोर्ड , रंग , ब्रश यांच्यासह मित्रमैत्रिणींचे टोळके माझ्या खोलीत आले . शाळेतल्या गप्पा , अभ्यास , बैठे खेळ , गाणी यांनी माझी खोली दुमदुमली . मी चालू - फिरु लागेपर्यंत हे रोज चालू होते .

 एका बाजूला फिजिओथेरपी चालू होती . थेरपी चालू असताना वेदना व्हायच्या , चालताना तोल जायचा , पण सगळे सहन करीत गेलो . औषधे , आहार काटेकोरपणे सांभाळत गेलो . फुटबॉल प्रशिक्षक मदने सर रोज माझे मनोबल वाढवायचे . 

सहा महिने कसे गेले कळलेच नाही . आता मी शाळेत चालत जाऊ लागलो आहे . माझे पाय भक्कम होत आहेत , हे माझे मलाच जाणवत आहे . फक्त थोडे दिवस थांबा . मी तुम्हांला माझ्या लाडक्या फुटबॉल मैदानावर दिसणार आहे !

माझी लढाई मराठी निबंध | Prasang Lekhan In Marathi 


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post