मी चहा बोलतोय मराठी निबंध

   मी चहा बोलतोय मराठी निबंध      


मी चहा बोलतोय

          तुमची नि माझी खूप गट्टी आहे . कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या , म्हणजे चहाच्या सेवनाने होते . चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही . कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की , तुम्ही माझी आठवण काढता . एक कप गरमागरम चहा मिळाला की , पुन्हा कामाला पुन्हा अभ्यासाला सुरुवात ! संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच .


         तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो . तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी . आता भारतात माझी खूप लागवड होते . ज्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं , तेव्हा येथे आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझी खूप लागवड केली . आसाममधील ब्रह्मपुत्रेचं खोरं , हिमालयाच्या पायथ्यावरील व तराईचा डोंगराळ भाग दार्जिलिंग , रांची , डेहराडून खोरं येथे आमची खूप लागवड केली जाते . आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की , परदेशात आमची निर्यात होते . भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो .

           आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला . स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात . दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्याटोपलीत टाकतात . तेथून आमची रवानगी कारखान्यात होते . पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात . यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं , वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं . तेव्हा तेथे आम्हांला विविध नावे मिळतात . 

             आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे . श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते . माझ्यापासून उत्तेजक पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात . बहुसंख्य लोक पाणी , दूध , साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात . काही देशांत चहात लिंबू , लोणी टाकतात , तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात , कुणाला चहा फार कडक लागतो , तर कोणाला अतिशय सौम्य लागतो . 

              कोणी टीकाकार चहाला ' अपेय ' मानतात . त्यांतील टॅनिनचा ते बागुलबुवा करतात . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , त्याच न्यायाने ' चहाबाजपणा ' तापदायक होतो . त्याचे व्यसन जडते . तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हांला माझी मोलाची मदत होते . अशी आहे ही तुमच्या - माझ्यातील दोस्ती !
मी चहा बोलतोय मराठी निबंध

अजून काही निबंध वाचण्यासाठी यावर क्लिक करा

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post