मी नेताजी बोलतोय मराठी निबंध
मी नेताजी बोलतोय
लहानपणी शाळेत असतानाच माझ्यावर स्वामी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा खूप पगडा बसला . त्यातूनच मी मानवांची समानता मानू लागलो . पण पुढे प्रेसिडेंट कॉलेजात परदेशी प्राध्यापकांकडून भारतीय विदयार्थ्यांचा केला जाणारा अपमान मला असह्य झाला . मला कॉलेजातून बाहेर काढण्यात आलं . पण माझं काही अडलं नाही . मी दुसऱ्या एका म्हणजे स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . १ ९ १७ मध्ये मी पदवीधर झालो . १ ९ १ ९ मध्ये आय . सी . एस.साठी मी इंग्लंडला गेलो . त्या परीक्षेत उत्तम यश मिळूनही मी सरकारी नोकरी स्वीकारली नाही . कारण ब्रिटिश सरकारविषयी माझ्या मनात विलक्षण चीड होती आणि हे जुलमी सरकार उलथवून टाकून माझा भारत स्वतंत्र करणं हेच मी माझ्या जीवनाचं ध्येय बनवलं होतं .
आम्ही भाग्यवान असे की , त्या काळात महात्मा गांधी , चित्तरंजन दास अशा महान व्यक्तींचं नेतृत्व आम्हांला लाभलं . त्रिपुरा काँग्रेसमध्ये मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडला गेलो . कामगारांसाठी चळवळ केली . पुढे मतभेदांमुळे काँग्रेसमधून बाहेर पडलो . ' फॉर्वर्ड ब्लॉक'ची स्थापना केली . पण आता या सनदशीर मार्गानी ब्रिटिशांना हाकलणं शक्य नाही , हे माझ्या लक्षात आलं . ब्रिटिशांना फक्त शस्त्राचीच भाषा कळेल , असं मला ठामपणे वाटू लागलं . मी जर्मनीमार्गे जपानला गेलो .
दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व जपान हे ब्रिटिशांचे प्रबळ शत्रू होते . म्हणून जर्मनी व जपान यांच्या मदतीने ब्रिटिशांना माझ्या देशातून हाकलण्याचं मी ठरवलं . मी ' आझाद हिंद सेने'ची स्थापना केली . ' चलो दिल्ली ' अशी घोषणा केली . प्रत्येक भारतीय माझ्या या घोषणेने थरारून उठला ; पण दुर्दैवाने माझं स्वप्न साकार झालं नाही . पुढची हकिकत तुम्हांला ठाऊक आहेच . पण मुलांनो , तुम्ही मोठे भाग्यवान आहात . तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात . तेव्हा स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी आयुष्यभर झटण्याची प्रतिज्ञा करा . जय हिंद !
मी नेताजी बोलतोय मराठी निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन