बहुजनहिताय बहुजनसुखाय मराठी निबंध

बहुजनहिताय बहुजनसुखाय मराठी निबंध

 
          ' बहुजनहिताय बहुजनसुखाय ' हे एक घोषवाक्य आहे , एक वचन आहे . बहुजन म्हणजे अनेकजण , पुष्कळ लोक . हे बहुजन म्हणजे खरे तर सर्वसामान्य जनता . जे काही करायचे आहे , ते या बहुजनांच्या हितासाठी , सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी ! सर्वसामान्यांना सुखी करण्यासाठी ! सर्व मानवसमाजांचा इतिहास काय सांगतो ? जगभर , सर्वत्र ' बळी तो कान पिळी ' हाच कायदा होता . माणूस हा सर्वांत दुबळा प्राणी . आपण एकटे स्वत : चे रक्षण करू शकत नाही , हे सत्य सर्वांना सुरुवातीलाच कळले . सगळ्या दुबळ्यांनी आपल्यातल्या बलवानाला आपला प्रमुख केले . त्याच्या खाण्यापिण्यापासूनच्या सगळ्या गरजा भागवण्याची जबाबदारी दुबळ्यांनी स्वीकारली . बदल्यात अपेक्षा एकच होती , त्या बलवानाने आपले रक्षण करावे . 

        ' राजा ' या शासनकर्त्यांचा जन्म हा असा झाला . हळूहळू त्याने स्वत : ला विष्णूचा अवतार मानायला सुरुवात केली . तो सर्वसामान्यांचे खरोखरच रक्षण करीत होता की नाही ? कोण जाणे ! पण हयातभर , सतत राजाच्या सुखासाठीच झटणे , हे सामान्यांच्या कपाळी लिहिले गेले . राजा , राजाचे सहकारी ऐषारामात लोळू लागले . बहुजनांच्या दुःखाला मात्र सीमा नव्हती . बहुजनांची बहुतांश संपत्ती ही या सत्ताधीशांकडे जमा होत होती . दीनांना मात्र कोणी वाली उरला नव्हता . सर्व समाज , सर्व माणसे सुखी आहेत , असे केव्हा म्हणता येईल ? 

          अन्न , वस्त्र , निवारा , आरोग्य व शिक्षण या स्वतःच्या प्राथमिक गरजा जेव्हा उत्तमरीत्या सर्व माणसांना भागवता येतील तेव्हा . पण प्रत्यक्षात असे दिसते को , सत्ता व संपत्ती असणारेच या गोष्टी मिळवू शकतात . या श्रीमंतांवर संकटे आली , तर त्यांना मदत करायला अनेकजण धावून जातात . पण सामान्य बहुजनांना मात्र संकटांच्या सोबतच जगावे लागते . त्यांचे आयुष्य दु : खांनी , अडचणींनी भरलेले राहते . त्यांच्यासाठी धावून जाणारा , त्यांची दुःखे दूर करणारा कोणी नसतो . त्यांचे दैन्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवले जाते . मानवी समाज खऱ्या अर्थाने सुखी करायचा असेल , तर या बहुजनांचे दुःख व दैन्य दूर झाले पाहिजे . त्यांचे कल्याण झाले पाहिजे . ' बहुजनहिताय बहुजनसुखाय ' या वचनाचे खरे मर्म हेच आहे . गौतम बुद्ध , येशू ख्रिस्त , महंमद पैगंबर या महात्म्यांनी हे मर्म बरोबर जाणले होते .
  
         म्हणून त्यांनी आपले सारे आयुष्य बहुजन मानवी समूहांसाठीच , त्यांच्या उद्धारासाठीच व्यतीत केले . महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , लोकमान्य टिळक , समाजसुधारक आगरकर , महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , महर्षी अण्णासाहेब कर्वे , महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , गाडगे महाराज , बाबा आमटे ... किती नावे घ्यावीत ! या महान माणसांनी आपले सर्वस्व ' बहुजनहिताय बहुजनसुखाय ' या वचनासाठीच वेचले . या साऱ्यांनी स्वतःहून हालअपेष्टा ओढवून घेतल्या , केवळ बहुजनांसाठी ! आपण आता लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली आहे . ही बहुजनांचीच व्यवस्था आहे . 

            Greatest good of the greatest number हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे . त्याचा आशयदेखील ' बहुजनहिताय बहुजनसुखाय ' असाच आहे . आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी अशी आहे की , या आपल्या व्यवस्थेत या बहुजनांचे कल्याणच होईल , याची आपण काळजी घ्यावी . तरच भारत सुखी होईल आणि पर्यायाने बलशालीही होईल .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post