प्रलयंकारी पाऊस मराठी निबंध
रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे धावणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या . रस्ते जलमय झाल्याने मोटारी , दुचाकी वाहने , बसेस जागच्या जागी थांबल्या आणि थोड्याच वेळात मुंबईची दळणवळण यंत्रणा बंद पडली . भरीत भर म्हणजे अनेक ठिकाणी टेलिफोन , मोबाइल यंत्रणादेखील बंद पडली सकाळी घराबाहेर पडलेली माणसे घरी परतू शकत नव्हती . रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत होते , त्यांत कित्येक गोष्टी , माणसे , जनावरे वाहून जात होती . असा प्रलय यापूर्वी कधीच झाला नव्हता . वरून पाऊस कोसळत होता .
माणूस अगतिक होऊन जागच्या जागी थांबला . अशा या प्रलयात एका असामान्य गोष्टीचा साक्षात्कार झाला . माणसांतील माणुसकी जागी झाली . पावसात सापडलेल्यांना , घरी जाऊ न शकलेल्यांना इतर लोक मदत करू लागले . कुणी पाणी दिले , कुणी चहा , कुणी जेवण , कुणी आसरा ... कोसळणाऱ्या पावसामुळे कुठे डोंगराचे कडे कोसळले . गरिबांच्या झोपड्या माणसांसह त्याखाली गाडल्या गेल्या . वर्षानुवर्षे लोकांनी जोडलेले किडूकमिडूक पाण्यात वाहून गेले . दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर कमी झाला . ठप्प झालेले जनजीवन मंद गतीने हलू लागले आणि नुकसानीचा अंदाज घेऊ लागले .
आता भीती होती रोगराईची . साऱ्या महाराष्ट्रात या कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला होता . गावेच्या गावे वाहून गेली होती . एरवी हवाहवासा वाटणारा पाऊस त्या दिवशी नकोनकोसा झाला होता
प्रलयंकारी पाऊस मराठी निबंध
पावसाळ्याची किंवा पावसाचे बऱ्याच ठिकाणी अतिशय छान छान वर्णन केलेले आपण बघतो ,ऐकतोएक ठिकाणी पावसाचे वर्णन असतानाच्या काही काव्यपंक्ती मला आठवतात
"वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे"
कवितेच्या ओळी फारच छान वाटल्या. आमच्या मनाला भावल्या. मला त्यावेळेस वाटले अगदी खरच आहे . पाऊस सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. सर्व चराचरामध्ये चैतन्य निर्माण करतो. आपल्या पृथ्वी मातेला सुजलाम-सुफलाम बनवतो.आपल्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी आणि धान्य देऊन जातो. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट अति झाली की माती होतेच.
सर्व माणसांचा मित्र त्यांचा पोशिंदा आणि सर्व जगाचा जीवन दाता असा पाऊस.
2019 साली मात्र पाउस त्याचं विनाशक आणि प्रलयंकारी रूप घेउनच आला होता. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस होईल असे हवामान खात्याने भविष्य वर्तवले होते; पण पाऊस मात्र मनात काही भलतेच घेऊन आलेला होता . सुरवातीचे पंधरा दिवस हा पाऊस फार आल्हाददायक आणि शांत वाटत होता; परंतु हळूहळू तिचा आवेश वाढू लागला. अधिक आवेगाने तो कोसळू लागला आणि थोड्याच वेळात न भूतो न भविष्यती असा कोसळू लागला . तेव्हा मात्र असं वाटू लागलं की हे काहीतरी वेगळेच आहे यावर्षी भयानक परिस्थिती निर्माण होणार.
महाराष्ट्रासह पूर्ण भारतभर या पावसाने हाहाकार माजवायला सुरुवात केली. कोणतेही राज्य सोडले नाही. आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर ,सातारा, सांगली या शहरांमध्ये ज्या रस्त्यावरून आम्ही भरधाव वेगाने गाड्या पळवल्या त्याच रस्त्यांवरून होड्या तरंगताना पहिल्या . गाई-गुरे, कुत्रे बकऱ्या असे अनेक प्राणी या पाण्यातून तरंगत आपला जीव वाचवताना बघितले. वाटले अरे पावसा जीवनदान देणारा तू आमचा जीव घेण्यासाठी इतका आतुर का झालेला आहेस.
सगळीकडे पाणी वाढलेले होते. रस्ते, रेल्वेचे रूळ सर्वच्या सर्व पाण्याखाली गेल्यामुळे धावणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या होत्या. रस्ते जलमय झाल्याने मोटारी, दुचाकी वाहने ,बसेस जागच्या जागीच थांबल्या होत्या ;आणि थोड्याच वेळात संपूर्ण दळणवळण यंत्रणा बंद पडली होती . त्यातच काही ठिकाणी दुःखाची बाब म्हणजे मोबाईल, टेलिफोन, इंटरनेट सर्व सुविधा ही बंद पडल्या होत्या.
या काळात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माणुसकी .ज्या ठिकाणी पावसाने असा धुमाकूळ घातला होता , अनेक संसार उध्वस्त झाले होते , लोकांच्या मिळकती पावसाने धावून काढल्या होत्या. गाठीला असलेले थोडे पैसे ,भांडीकुंडी कसेबसे वाचले होते. याहीपेक्षा जीव वाचला होता याचे महत्त्व अधिक होते . अशांसाठी संपूर्ण राज्यांमधून मोठ्याप्रमाणात मदतीचा हात सर्वांनी दिला . जणू पावसाला आपल्या स्वभावातून सर्व माणसांनी दाखवून दिले , तू आमची कितीही परीक्षा बघ पण आम्ही एकमेकांना साथ देऊन पुन्हा नव्याने उभे राहू. इतर वेळी पावसाच्या आगमनासाठी आतुरलेले आम्ही मात्र तो निघून जावा यासाठी देवाची प्रार्थना करत होतो. कारण सतत हवाहवासा वाटणारा पाऊस आता नको नकोसा वाटू लागला होता.
Tags:
मराठी निबंध लेखन