कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे संपूर्ण माहिती

रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती 

एखादी कविता ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर मन एका अनामिक आनंदाने भरून जावे, कधी डोळा पाणी 
यावे, कधी रसाविष्कारात चिंब ओले व्हावे म्हणजे काव्याचा आस्वाद सुरू झाला असे समजावे. कविता वाचताच 
कधी शब्दांतला ताल रुणझुणायला लागतो, तर कधी कवितेतले शब्द बोलायला लागतात. 

असं का होतं? 
तर काव्याचा आस्वाद ही आपली प्रत्येकाची मानसिक भूक असते. जात्यावर गाणे म्हणणारी स्त्री, अंगाई गाणारी आई, हार्मोनियमवर गीत वाजवणारा वादक, काम करता-करता रेडिओवर गाणी ऐकणारा रसिक श्रोता हे आपापल्याआवडीनुसार गाण्याचा, कवितेचा आस्वाद घेत असतात. हा आस्वाद, ही रसिकता चिकित्सक, चोखंदळ असतेच असे नाही. 
कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती


कवितेचा आस्वाद चिकित्सकपणे, चोखंदळपणे, सौंदर्यपूर्ण दृष्टीने घेता यावा, यासाठी ‘रसग्रहण’ 
प्रक्रियेचा अभ्यास करावा लागतो.कवितेतील विचार, भावना, अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीके आणिकल्पनाविलास इत्यादी घटकांच्या मांडणीचा आणि त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करणे म्हणजे ‘रसग्रहण’ होय. 

 कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती 

कवितेत उपरोक्त घटक कमी-जास्त प्रमाणात आढळतात. कधी कधी काही घटक नसतातही. 
त्यामुळे रसग्रहणाच्या लेखनाचे विशिष्ट नियम सांगता येत नसले तरी रसग्रहणलेखनाचेही एक शास्त्र विकसित 
झालेले आहे; परंतु तसे तेही काटेकोर नाही. त्यामुळे या शास्त्रालाही कलात्मकतेची जोड आवश्यक ठरते.
काव्यात रसाची महती अनन्यसाधारण आहे. काव्यवाचनाने आणि काव्याभ्यासाने रसिकांच्या मनातील विविध 
भावनांच्या तारा छेडल्या जातात. उत्कटता वाढीस लागते. तिचे पर्यवसान ‘रस’ निर्मितीत होते.

 रसनिर्मिती ही भावनेच्या परिपोषावर अवलंबून असते. मानवी अंत:करण म्हणजे भाव-भावनांचा जणू समुद्रच. ज्या भावना स्थायी, मूलभूत असतात त्यांचा परिपोष झाल्याने रसनिष्पत्ती होते. शृंगार, वीर, करुण, हास्य, भयानक, रौद्र, बीभत्स, अद्‌भुत, शांत असे नऊ रस मानले आहेत. शब्दयोजना, काव्यानुभव, छंद, लय, आघात, प्रतिमा, प्रतीके इत्यादी 

घटकांतून रसनिर्मिती होते. 
वरील विवेचनावरून काव्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतात. 

कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती


* काव्याची वैशिष्ट्ये (कवितेचे रसग्रहण)


(१) कवितेत भाषा हे माध्यम असते. अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती हा प्रमुख हेतू असतो. 
(२) कवितेत अर्थाच्या विविध छटा व्यक्त करणारी आणि सौंदर्यनिर्मिती करणारी शब्दयोजना असते.
(३) कवितेमध्ये रचनाकौशल्याला महत्त्वाचे स्थान असते. छंद, वृत्त यांच्या आधारे वा मुक्तछंदात कविता केली 
जाते. 
(४) तिच्या रचनापद्धतीमुळे श्रवणसुभगता आणि स्मरणसुलभता ही गुणवैशिष्ट्ये साधली जातात.
(५) कवितेचे लेखन हे छंद, वृत्त यानुसार असल्यामुळे काही वेळा व्याकरणाचे नियम त्यामध्ये गौण ठरतात.
(६) कवितेत कमीत कमी शब्दांत मोठ्यात मोठा आशय व्यक्त झालेला असतो. (अल्पाक्षरत्व)
(७) शब्दांना नेहमीचा वा नेहमीपेक्षा वेगळा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 
     शब्दशक्तींचा वापर प्रकर्षाने कवितेत असतो.

काही कवितेत विशिष्ट पद्धतीने शब्दरचना केलेली असते. काही कवितांची रचना ‘मात्रांनी’ सजलेली असते. 
अशा नाद, लय, वृत्त, छंद, अलंकार इत्यादी घटकांमुळे कवितेची रचना वैशिष्ट्यपूर्णठरते. कवितेत आशयानुरूप
लय असते.
 कवितेतील शब्दांना अर्थपूर्ण नाद असतो. या साऱ्या घटकांमुळे कविता हृदयापर्यंत पोहोचते. त्यांतील 
शब्दच्छटा, अर्थच्छटा यांमुळे कवितेचा गर्भितार्थ मनाला भिडतो आणि रसनिर्मिती होते.

* अलंकार, प्रतिमा व प्रतीके

अलंकारांमुळे कवितेला सौंदर्यप्राप्त होते. कवितेतील शब्दांवर, त्यांतील अक्षरांवरील चमत्कृतींवर जे अलंकार 
आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आहेत. काव्यामध्ये
शब्दांच्या अर्थामुळे जेव्हा चमत्कृती उत्पन्न होते, तेव्हा ते अर्थालंकार म्हणून ओळखले जातात. उपमा, रूपक, 
चेतनगुणोक्ती हे व असे अनेक अर्थालंकार आहेत.

कवितेचे रसग्रहण करताना यासंबंधीची उकल महत्त्वाची ठरते.अलंकारांइतकेच कवितेतील ‘प्रतिमा’ व‘प्रतीके’ हे घटक महत्त्वाचे असतात. ‘प्रतिमा’ ही काव्याचा एक भाग असते. दोन किंवा अधिक वस्तूंमधील साम्य किंवा वेगळेपण ‘प्रतिमेच्या’ माध्यमातून दाखवले जाते; तसेच कवितेतील ‘प्रतीकांतूनही’ वेगवेगळे अर्थ सूचित होतात. हेच खरे तर ‘कविता’ या साहित्यप्रकाराचे वैशिष्ट्य असते. 

* रसग्रहण करताना हे लक्षात ठेवा.

वरील सर्व मुद्‌द्यांचा अभ्यास केल्यानंतर कवितेचे घटक तुमच्या लक्षात येतीलच. दिलेले मुद्दे लक्षात घेऊन 
तुम्ही कविता बारकाईने वाचा. कवितेची चाल मधुर असेल, तिच्यातील भावना अंत:करणाला भिडणाऱ्या असतील, 
तिच्यातील कल्पना चमत्कृतीपूर्ण असतील, कवितेचा भाषिक आकार लहान, रचना सोपी; पण अर्थपूर्ण असेल 
आणि शब्दांत नादमाधुर्य असेल तर ती कविता थेट हृदयापर्यंत पोहोचते. 

रसग्रहण करताना वरील मुद्‌द्यांसोबत कवितेतील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. कवितेत
भावनांची उत्कटता, कल्पनाविलास, विचारसौंदर्य आणि प्रसाद, माधुर्य, ओज हे गुण असतात. कवितेची मध्यवर्ती
कल्पना एखाद्या विषयाभोवती गुंफलेली असते. उदा., निसर्गवर्णन, शब्दचित्र, व्यक्तिचित्र, विडंबन, विनोद, 
उपदेश इत्यादी. 

कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात विशद करून कवितेतील 

  1. भावना, 
  2. कल्पना, 
  3. विचार, 
  4. सूचकता, 
  5. नादमाधुर्य, 
  6. चाल, 
  7. अलंकार, 
  8. काव्यगुण, 
  9. काव्यशक्ती, 
  10. कवितेचा वाङमयप्रकार ‌(आशयानुसार),
  11.  कवितेचा रचनाप्रकार, 
  12. कवितेतील सूचकता, 
  13. प्रतिमा आणि प्रतीके 

यांपैकी जे जे गुण आढळतात त्या सगळ्यांची नोंद घेणे 

किंबहुना वरील गुणांच्या अनुषंगाने कवितेचा सूक्ष्म अभ्यास म्हणजे कवितेचे रसग्रहण होय. सगळ्यात महत्त्वाची 
बाब म्हणजे कवितेतील ओळी तुम्हांला का आवडतात याचे कारण आणि त्या ओळींचा तुमच्या मनावर झालेला 
परिणाम सांगणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच कवितेचे सौंदर्यदर्शन घेणे म्हणजेच ‘रसग्रहण’ होय.

खाली दिलेल्या पाच मुद्‌द्यांना अनुसरून रसग्रहण करावे. 

(१) कवितेचा विषय आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना. 
(२) कवितेतील प्रतिमा, प्रतीके, अर्थालंकार, आंतरिक लय, अर्थाचे सौंदर्य.
(३) कवितेतून सूचित होणारे काव्यगुण, शब्दशक्ती, भाषाशैली-
(संवादात्मक/निवेदनात्मक/चित्रदर्शी असल्यास).
(४) कवितेतील शब्दालंकार, नाद, बाह्य लय, छंद, वृत्त इत्यादी.
(५) कवितेतून मिळणारा संदेश, मूल्ये आणि कविता आवडण्याचे कारण. 
कवीला कवितेत काय सांगायचे आहे अन्‌त्याने ते कसे सांगितले आहे; याचे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या
संवेदनशील मनाने विचारपूर्वक केलेले विवेचन म्हणजेच ‘रसग्रहण’ करणे होय.


कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती 

रसग्रहण  - शिशुवर्गात तालासुरात बडबडगीते म्हणणारा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊ लागतो, तेव्हा लहानपणी गायलेल्या कवितांचा अर्थ त्याला कळू लागतो किंबहुना मोठ्या वर्गात वृत्त, अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र कळू लागतं. 

कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदानं भरून जातं. कधी डोळ्यांत पाणी येतं, कधी मन अंतर्मुख होतं, कधी कवितेतील व्यक्तिचित्र, घटना, नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं, तर  कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रणाची जाणीव त्याला होते. 

या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार म्हणजेच कवितेच्या आस्वादाकडे मन वळतं आहे याचं चिन्ह होय. कृतिपत्रिकेतील पद्यविभागाच्या मूल्यमापनामध्ये कवितेचे रसग्रहण हा घटक समाविष्ट केलेला आहे. ‘रस’  या घटकाचा अभ्यास तुम्ही इयत्ता नववीत केलेला आहे. या कवितेचे रसग्रहण करता येणे, कवितेचा आस्वाद घेता येणे, यादृष्टीने कवितांचा अभ्यास करायचा आहे.

कवितेचे रसग्रहण आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक सौंदर्य (भाषिक वैशिष्ट्ये) या तीन प्रमुख  मुद्‌द्यांना धरून केले जाते. या तीन मुद्‌द्यांमध्ये अगदी स्पष्ट विभाजन रेषा नसते. ते एकमेकांमध्येमिसळून गेलेले  असतात, म्हणूनच कवितेमध्ये त्यांचा एकत्रितपणे अनुभव येतो. कवितेत अल्प शब्दांतून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. कवितेत अचूक आणि चपखल शब्दनिवड असते.

 कल्पनांच्या माध्यमातून, कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते. याशिवाय कविता आवडण्याचे  वा न आवडण्याचे कारणही तुम्हांला सांगता यायला हवे. याशिवाय कवितेचे खालील अंगभूत गुण तुम्हांला माहीत असायला हवेत. 

(१) काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. 
(२) शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात. 
(३) शब्दांना आंतरिक लय असते तर कधी रचनाच तालबद्ध असते. 

वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय आणि भाषासौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो. लक्षात ठेवा, की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करायचे असेल तर तेही त्या मुद्‌द्यांना धरून करता यायला हवे. प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडतील असे नाही; परंतु त्या ओळीतील आशयाचे काव्यसौंदर्य उलगडता यायला हवे, हे महत्त्वाचे असते.

आशयसौंदर्य

कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून  मिळणारा एकत्रित अनुभव

काव्यसौंदर्य 

अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना.

भाषिक वैशिष्ट्ये

कवींची भाषाशैली (ग्रामीण,  बोलीभाषा, संवादात्मक भाषा, निवेदनात्मक, चित्रदर्शी) शब्दालंकार, आंतरिक लय, नादमाधुर्य वृत्त (असल्यास)

काव्यसौंदर्य

काव्यसौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनाने अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना
शब्दात्मक रूप देणे होय. कवींची मूळ संकल्पना, भावना, विचार यांच्या सजावटीसाठी कवीने केलेली विशिष्ट
मांडणी, योजलेले शब्दालंकार, अवलंबलेले वृत्त त्याचप्रमाणे कवीने निर्मिलेल्या सृष्टीचे आपल्या मनावर झालेले 
संस्कार आणि त्यावरून आठवणारी इतर क्षेत्रांतील साम्यस्थळे यांचा एकत्रित परिणाम काव्यसौंदर्यात असतो. 
कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण समर्पक शब्दांत सकारण कथन करणे म्हणजे काव्यसौंदर्य जाणणे 
होय.

काव्यसौंदर्यामध्येविचारसौंदर्य, आशयसौंदर्य आणि भावसौंदर्य 
अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. कवितेत विचार, आशय आणि भाव या तीन वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांच्यातील विभाजनरेषातितकीशी स्पष्ट नसते कारण त्या परस्पर संबंधित असतात. प्रसंगानुरूप, व्यक्तिपरत्वेया संज्ञा वापरल्या जातात. त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खाली दिलेले आहे. त्यांचा अभ्यास करा.

कवितेत कवी एखादा विषय मांडत असतो. 

उदा., ‘आश्वासक चित्र’ या कवितेत ‘स्त्री-पुरुष समानता’ हा विषय मांडलेला अाहे. ‘आकाशी झेप घे रे’ 
या कवितेत श्रमांच्या मूल्याचा विचार मांडलेला आहे. कवितेत वेगवेगळ्या भावभावना प्रकट झालेल्या असतात. 

उदा., ‘वस्तू’ या कवितेत निर्जीव वस्तूंविषयीची कवींची संवेदनशीलता प्रकट होत असते.
आता तुमच्या लक्षात येईल, की कवितेचा विषय, आशय, कवितेत मांडलेला विचार, कवितेतील मूल्य, 
दिलेला संदेश आणि भावभावना या सगळ्यांमधून काव्यसौंदर्य प्रकट होत असते. त्यामुळे काव्यसौंदर्याचा अभ्यास 
करताना प्रत्येक मुद्‌द्याचा विचार करावा. कृतिपत्रिकेतील काव्यसौंदर्यांतर्गत येणाऱ्या विचारसौंदर्य, भावसौंदर्य व 
अर्थसौंदर्ययावर आधारित कृतींचा अभ्यास खालील मुद्‌द्यांना धरून करावा.

अर्थसौंदर्य

कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशयाला पुढे नेणारा विषय, शब्दांचा चपखल वापर, अर्थच्छटा, अलंकार  इत्यादी.

विचारसौंदर्य

कवितेतून व्यक्त होणारा विचार,  कधी सर्वसमावेशक तर कधी  नेहमीपेक्षा वेगळा, अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार इत्यादी.

भावसौंदर्य

कवितेतून व्यक्त होणारा भाव,  वाच्यार्थाच्या पलीकडील भावार्थ,  भावनांचा आविष्कार, संवेदनशीलता रस, कल्पना, प्रतिमा इत्यादी.

कवितेचे रसग्रहण - रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे  संपूर्ण माहिती 

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post