सत्यमेव जयते मराठी निबंध

सत्यमेव जयते मराठी निबंध

सत्यमेव जयते मराठी निबंध


       । सत्यमेव जयते । ' हे स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य आहे . या ब्रीदवाक्याद्वारे भारत साऱ्या जगाला सांगतो की , शेवटी सत्याचाच जय होतो . लहानपणापासून हे आपल्या मनावर बिंबवले जाते की , ' खोटे कधी बोलू नये . ' त्यासाठी पुराणकाळापासूनच्या अनेक कथा आपल्याला सांगितल्या जातात . एक मात्र खरे की खोटेपणा थोडा काळ टिकतो . तो कायम कधीच टिकत नाही . सत्यवचनी व्यक्तीला अनेकदा खूप त्रास सहन करावा लागतो . तिचे यश तिच्यापासून दूर जाते आहे असे वाटते ; पण अंतिम विजय तिचाच होतो . सत्यासाठी रामाने वैभवाचा त्याग केला आणि वनाचा रस्ता धरला . रामाचा मार्ग सत्याचा होता आणि रावणाचा मार्ग असत्याचा होता . 

         शेवटी रामाचा म्हणजे सत्याचाच जय झाला .राजा हरिश्चंद्र हा सत्याचा पूजक होता . त्याने स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःचाही लिलाव करून घेतला . राजा युधिष्ठिराने आयुष्यभर सत्याचाच अवलंब केला . युद्धाच्या वेळी रणनीती जपण्यासाठी सत्यपरायण युधिष्ठिर अर्धसत्य बोलला - ' नरो वा कुंजरो वा ' आणि त्याची शिक्षा त्याला परलोकात जाताना सहन करावी लागली . सत्याचा त्याग करून असत्य स्वीकारले , तर एका असत्यासाठी पुनःपुन्हा असत्यच बोलावे लागते . एक खोटी गोष्ट पचवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते . 

         विदयार्थी आपली एखादी चूक कबूल न करता एखादी थाप मारतो . त्यामुळे क्षणभर त्याचा बचाव होतो ; पण ती थाप , ते असत्य पचवण्यासाठी त्याला पुनःपुन्हा थापा माराव्या लागतात . माणूस असत्य का बोलतो ? कारण सत्य बोलण्याचे त्याला धाडस नसते . सत्य बोलण्याने कदाचित आपल्याला त्रास सहन करावा लागेल , अशी भीती त्यामागे असते . पण तो त्रास सहन करण्याचे धैर्य बाळगले पाहिजे . कारण ' साहसे श्रीः प्रतिवसति । ' महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सत्याचाच आग्रह धरला . 

        आपली झालेली प्रत्येक चूक त्यांनी कबूल केली . म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ' सत्याचे प्रयोग ' हे नाव दिले आहे . जोतीराव फुले यांनीपण सत्याचीच कास धरण्याचा संदेश दिला . समाजातील असत्य , पाप , अन्याय यांचा नायनाट करण्यासाठी ' सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ' असे संत तुकाराम महाराज सांगतात . कारण या महात्म्यांच्या मते , ' सत्य हाच परमेश्वर ' आहे . आजच्या जागतिक राजकारणातही शेवटी सत्याचाच विजय होईल , याबाबत मला तीळमात्रही शंका वाटत नाही . 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post