या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध

या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध

या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध

         " कंटाळा आला बुवा या जगण्याचा ! परमेश्वरा , सोडव बाबा या जगातून ! " असे देवाला आळवणारे पुष्कळजण आपल्याला भेटतात . क्षुल्लक अपयशाने खचून जाऊन काही जण आत्महत्या करतात आणि आपले मौल्यवान जीवन संपवून टाकतात . अशा या लोकांना कवी मंगेश पाडगावकर सांगतात , ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे . ' खरे पाहता आपण आपले डोळे उघडे ठेवले , तर आपल्याला अशा अनेक गोष्टी आढळतील की , त्या आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात . 

          चंचल वारा , कोसळणाऱ्या जलधारा , भिजलेली काळी माती , त्यातून वर आलेली हिरवीगार रोपांची पाती , त्यावर फुलणारी नाजूक , हळवी फुले या सुंदर गोष्टी माणसाला अधिक जगण्याची प्रेरणा देतात . कवी बा . भ . बोरकर आपल्या एका कवितेत सांगतात की , निराश , वैफल्यग्रस्त होण्याचे कारण नाही . सुखाचे , आनंदाचे क्षण सदैव आपल्या अवतीभोवती असतात . ते आपल्याला पकडता आले पाहिजेत . आईबाबांच्या सहवासात असे प्रेमाचे क्षण मिळतात . आपल्या गोठ्यातील गुरांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला , तरी त्या जनावरांच्या डोळ्यांतील प्रेमळ भाव , कृतज्ञता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते .

         ' जगणे ' ही गोष्टच मुळी आनंददायी आहे . आपण जगावे आणि इतरांना जगू दयावे . किंबहुना इतरांना जगवण्यातच जास्त आनंद आहे . जो दुसऱ्यांसाठी जगतो , तोच खरा जगतो . एखादया सत्कार्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्याला आपल्या स्वतःच्या जगण्याची आठवणही राहत नाही . बाबा आमटे हे एक वकील होते . खाऊनपिऊन सुखी घरात ते जन्मले होते . ठरवले असते , तर ते वैभवात लोळत राहू शकले असते . पण स्वतःपुरते सुखासीन जीवन जगणे त्यांना रुचत नव्हते . म्हणून मग त्यांनी आपले आयुष्य अपंगांसाठी , कुष्ठपीडितांसाठी वाहिले . ते घरदार सोडून त्यांच्यात रमले . हे कार्य करताना विविध प्रकारची संकटे , अडचणी यांना त्यांनी तोंड दिले ; पण कोणत्याही प्रसंगी ते खचले नाहीत . त्यांना वैफल्य आले नाही . कारण त्यांना जगण्याचा अर्थ समजला होता .

          सर्वांनाच काही बाबा आमटे होता येणार नाही . पण आपल्या छोट्याशा जीवनातही असे काम करावे की , त्याने आपल्यालाही आनंद मिळेल आणि दुसऱ्यालाही देता येईल . आपण चांगली पुस्तके वाचतो . ती वृद्धांना , अंधांना वाचून दाखवावी . छोट्यांना कथा सांगण्यातील आनंद किती मोठा आहे , ते सानेगुरुजींच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांतून कळते . आपल्या गात्रांचा उपयोग इतरांच्या सुखासाठी करावा . आपण थोट्याचे हात व्हावे , लंगड्याचे पाय व्हावे , अंधाचे डोळे व्हावे , वृद्धाची काठी व्हावे म्हणजे मग जगण्यातील आनंद निश्चितच गवसेल .

या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post