शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (आत्मकथा निबंध )

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (आत्मकथा निबंध )

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध  (आत्मकथा निबंध )

        मी आहे एक छोटा शेतकरी . महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे . फारशी सुपीक नाही ; पण नापीकही नाही . या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत . या जमिनीवर माझं जिवापाड प्रेम आहे ; पण या प्रेमानं काय भागणार ? पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर , म्हणजे आपल्या पावसावर ! आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही . लहानसहान नदयांना पाणी असतं , पण तेही पावसावरच अवलंबून . उन्हाळ्यात त्यापण आटून जातात . त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की , आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात . कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेतं नांगरून ठेवायची , काटकुटं काढायचं , ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं . 

       अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं , पण पाण्याचा पत्ताच नाही . चार - चार , पाच - पाच कोसांवरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात . मग कधीतरी अवचित मळभ येतं . अंग गदगदून निघतं . सोसाट्याचं वारं सुटतं . इतक्यात पावसाचे थेंब टपटप गळू लागतात . क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं . सारा गाव - लहानमोठी , म्हातारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात . पावसात फक्त शरीरंच भिजतात , असं नाही ; तर मनंही निवतात . आता शेतीला लागायला हवं . भिजलेल्या जमिनीत बी - बियाणं टाकायला हवं . पाऊसराजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात .  
          
          पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर . तेवढ्यात येईल ते पीक , मिळतील ते दाणे . त्यावर सगळं वर्ष काढायचं , हेच आम्हां कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला . उरलेल्या आठ महिन्यांत दुसरं पीक घेता येत नाही . कमी पाण्यावरची नाचणी , वरईसारखी पिकं घ्यावी लागतात . त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सावकाराचे उंबरठे झिजवावे लागतात . भरमसाट व्याजाने पैसे घ्यावे लागतात . मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो . आमच्या गावापासून बऱ्यापैकी अंतरावरून मांजरी नदी वाहत आहे .
 
         इकडच्या भागातील नदयांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे . या नदीवर धरण बांधलं आणि कालव्यांच्या मदतीने तिचं पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल ! आम्ही पण दोन पिकं काढू शकू , बागायत करू शकू ; पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार ? परमेश्वरच जाणे ! नवनीत

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध  (आत्मकथा निबंध )

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध  (आत्मकथा निबंध )


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post