श्री दत्ताची मानस पूजा - श्री दत्त महाराज
डोळे मिटून खालीलप्रमाणे श्रीदत्ताची मानसपूजा करावी
।। श्री गणेशाय नम : ।। श्री सरस्वतैय नमः ।।
बाळ विनवी सर्व देवतांना, बुद्धीमागे दत्त उपासना लिहिण्याला।
ऊर्जा ओतून लेखणीत, मागे ओजस्विता जन कल्याणाला।
श्री गुरू दत्तात्रेय आहेत कृपेचे सागर ।
रूप तुमचे माझे मनी, राहो निरंतर ।।
ब्रह्मा, विष्णु, शंकराची ही त्रयमूर्ती ।
स्मर्तगामी होऊनी सदा भक्तासी उद्धरती ।
घेऊनी गोमाता, श्वान, राही दत्त औदुंबरा खाली ।
ध्यानस्थ त्यांची मूर्ती, सर्व जगताची वाली।
जोडूनी हात ठेवूनी माथा तवचरणी ।
शरणागत मी ऐक माझी विनवणी ।
प्रार्थना करीत मी हृदयासन मांडिले ।
बसूनी त्यावरी उमटू दे तव पाऊले ।
पूजेसाठी मी आणिली पुष्पे मोगरी ।
भक्तिभावाने मी ठेवितो तव चरणावरी ।
स्वीकारी मम पूजा तू कृपाळू दत्ता दयाळा ।
सेवा करीन सदा मी, दर्शन दे कृपाळा ।
चरण धुण्या तव मी पाणी आणिले गंगेचे ।
स्नान करी बा मजकडून सुगंधी जलाचे ।
पात्री ठेवूनी दूध अभिषेक करितो मी तयाचा ।
शरणागत मी तुझा, ठेवी हात आशीर्वादाचा ।
पंच ज्ञानेंद्रियांचे टाकून पंचामृत ।
सद्भावे देतो मी करी तू स्वीकृत ।
भक्तीच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र निर्मल ।
नेसावे देवा कायेवरी तुझ्या कोमल ।
अष्टगंध आणिले तुजसाठी उगाळून ।
लावून भाळी घ्यावे देवा, या सेवकाकडून ।
बिल्वपत्री ती त्रिगुणात्मक आणिली वाहण्या तुला ।
तुलसी, दुर्वा वाहतो टाकून माझा सात्त्विक भाव भला ।
शेवंती पुष्पांचा हार मी अर्पण करी ।
सत्कार्याचा धूप माझा सरू दे आपली दूरी ।
आरतीत मी भक्तीची वात लावतो ।
दत्ता तुला ती ज्योत प्रेमभावे ओवाळितो ।
नैवैद्य जिवाचा लावितो तव भोजनी ।
मीपणा सोडून मी लीन तुझ्याच चरणी । ।
पंचप्राण ही अर्पितो पंचपक्वान्न रूपाने ।
पंचतत्त्वाची फळे अर्पितो शांतीच्या रूपाने ।
हस्त प्रक्षालन करी मम तपाचरणाने ।
विडा मम प्रीतीचा खाई तू आनंदाने ।
पूजा घेऊनी स्वीकारी मंत्र पुष्पांजली ।
अपार महिमा तुझा अपुरी माझी शब्दांजली ।
करी कृपा बाळावरी, देऊन आशीर्वाद निरंतर ।
प्रसन्न राही मजवर सदा, हे दत्त दिगंबर ।
Tags:
देवांची माहिती