पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन marathi nibhand

पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन 

पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन marathi nibhand
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन


      " ऐकलंत का रे सगळ्यांनी ; आता या घराचे नूतनीकरण होणार आहे म्हणे ! " अरे बापरे ! म्हणजे आपल्या उरल्यासुरल्या भावंडांना दुकानात विक्रीसाठी पाठवणार . घरात नव्या पद्धतीची भांडी आणायला हवीत ; अशी वहिनीची कुरकूर चालू होतीच . म्हणजे आपला पितळी धातूचा जमाना संपला , असे म्हणायला हरकत नाही . मला आठवतंय , खूप वर्षांपूर्वी आजीने किती हौसेने आम्हांला विकत आणले होते . स्वयंपाकासाठी , पाणी साठवण्यासाठी , वस्तू भरून ठेवण्यासाठी आम्हांला स्वयंपाकखोलीत मानाचे स्थान होते . घरातला रुचकर स्वयंपाक जेव्हा आमच्यामध्ये शिजायचा तेव्हा आम्हांला धन्य धन्य वाटायचे . किती मजेचे आणि मानाचे दिवस होते ते !
   
      सणासुदीला श्रीखंड , बासुंदी , मसाला दूध यांनी आम्ही न्हाऊन निघायचो . भरली वांगी , डाळिंबी , पंचामृत , डाळीची आमटी यांच्या वासाने आम्ही तृप्त असायचो . खरं तर आम्हांला गरम चुलीवर पदार्थ गरम करण्यासाठी पुन्हा पुन्हा ठेवत . आम्ही सारे लालबुंद होत असू . पण आलेले पाहुणे बोटे चाटून जेवले की आजीचा समाधानी चेहरा पाहताना आम्हांला खूप बरे वाटे . आजी आमची उत्तम बडदास्त ठेवत असे . आम्हांला दर दोन दिवसांनी चिंच - मीठ लावून लख्ख घासून घेतले जायचे . त्या वेळी स्वयंपाकखोलीतील फळी आमच्यामुळे झळाळून उठायची . 

         वर्षातून एकदा आमची रवानगी कल्हईवाल्याकडे व्हायची . तो तर पेटत्या धगीवर भाजून काढत असे . त्यानंतर आतून चकचकीत कल्हई लावत असे . त्या वेळी चंदेरी रंगाच्या कल्हईमुळे आम्हांला नवे झगे घातल्यासारखे वाटे . आता स्वयंपाकखोलीचे किचन झाले . पितळेच्या जागी स्टील आले आणि आता तर निर्लेप ; बजाज आले . काचेची आणि सिरॅमिकची भांडी तर कपाटात जागा पटकावून बसलीच आहेत . पण आम्हाला आशा आहे , लोकांना परत चुलीवरचे जेवण आवडायला लागले आहे . तसेच आमचा ( पितळी भांड्यांचा ) जमाना परत येईल .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post