माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.

माझे घर मराठी निबंध

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.


             घर असावे घरासारखे । नकोत नुसत्या भिंती । प्रेम , जिव्हाळा लाभो तेथे । नकोत नुसती नाती । कवयित्री विमल लिमये यांच्या कवितेतील या ओळी मला खूप भावल्या , त्याला कारणही तसेच आहे . माझे घरही तसेच आहे . घरातील आईबाबा , आजीआजोबा , ताई ही सारी ' जिव्हाळ्याची बेटे ' आहेत . पाहुण्यांचे आदरातिथ्य हा आमच्या घराचा आत्मा आहे . तर घरातील प्रत्येकाला स्वत : चे मत मांडण्याचे , विकास करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे . तसे घरात आजी आणि आजोबांची मजेदार भांडणे होतात . 

         चिडवाचिडवी , रडारड , रुसवेफुगवे सगळ्या गोष्टी आमच्या घरी मुक्तपणे होतात . तसेच , राजकारणापासून ते संध्याकाळी स्वयंपाक कोणता करायचा इथपर्यंत सर्व विषयांवर मुक्त चर्चाही घरी होते . त्यामुळे घरी संवाद साधण्याची कधी भीती वाटत नाही . आता माझ्या बाबतीत घडलेला प्रसंगच पाहा , म्हणजे तुम्हांला याचा प्रत्यय येईल . गेल्या वर्षी नववीत असताना प्रथम सत्र परीक्षेत मी दोन विषयांत चक्क नापास झाले . माझ्या काही मैत्रिणीही नापास झाल्या होत्या . त्यांना निकालपत्र घरी दाखवायची खूप भीती वाटत होती . तसे मलाही वाईट वाटले होते , पण घरी सांगायची भीती वाटत नव्हती . त्या दिवशी घरी सर्वांना निकालपत्र दाखवले . 

          घरी शांतता पसरली होती . संध्याकाळी बाबा म्हणाले , " ' मीरा , तुला गुण कमी का मिळाले त्याचे कारण कळेल का ? ' ' गेले वर्षभर कब्बड्डीच्या सामन्यांमुळे मी मैदानावरच होते , त्यामुळे विज्ञान व गणित विषयांतील मूळ संकल्पना नीट कळल्या नाहीत ' असे मी म्हणाले आणि माझ्या डोळ्यांतून गंगा - यमुना वाहू लागल्या . सगळ्यांनी मला मनसोक्त रडू दिले . 

त्यानंतर घरी अभ्यास व खेळ यांच्या वेळाचे नियोजन करण्यात आले . आजोबा आणि आईने न समजलेल्या संकल्पना पक्क्या करून घेतल्या . बाबांनी सराव घेतला . त्यामुळे द्वितीय सत्र परीक्षा उत्तम गुणांनी मी पास झाले . संकटसमयी संयम बाळगणे , अपयशावर मात करणे अशा अनेक गोष्टी माझ्या घराने मला प्रसन्नपणे शिकवल्या .

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi.


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post