वाचाल तर वाचाल ! निबंध मराठी
अभिनेते चंद्रकांत मांढरे आपल्या फावल्या वेळात संदर निसर्गचित्रे काढत . आज त्यांच्या या छंदातून देशाला एक रम्य ' आर्ट गॅलरी ' उपलब्ध झाली . ' वाचन ' हा असाच एक उपयुक्त छंद आहे . पण या छंदाची ओळख अगदी लहानपणीच व्हायला हवी . एकदा भाषेतील अक्षरांची ओळख झाली की माणसाला वाचायला येऊ लागते . मला आठवतेय , जेव्हा आपल्याला प्रथम वाचायला येते , तेव्हा आपल्याला किती विलक्षण आनंद होतो ! मग दिसतील ते शब्द आपण वाचू लागतो .
रस्त्यावरच्या पाट्या , पुडी म्हणून आलेले कागद सगळे आपल्या नजरेखालून जातात . वाचनाचा छंद आपल्याला लागायला कुणीतरी कारणीभूत होत असते . कधी आपली आई आपला हा छंद जोपासत असते , तर कधी आजी निमित्त होते . एखादे शिक्षक त्या बालवयात वाचनाचे वेड आपल्याला लावतात आणि मग आपण वाचतच राहतो . ज्ञान हे अगाध आहे . त्याला एक जन्म पुरणार कसा ! मग वाचक आपली आपली आवड ठरवतो . त्या प्रकारचे जास्तीत जास्त वाचन करतो . वाचनाने ज्ञानप्राप्ती होते आणि मनोरंजनही होते . वाचन माणसाला मोठे करते . त्याचे मन विशाल करते . वाचताना आधी व्याधींचा विसर पडतो . आपण एका वेगळ्याच जगात जातो . मग तो ' हॅरी पॉटर ' असला तर आपण त्याच्याबरोबर अद्भुत जगात शिरतो .
' गोट्या ' असला तर गरिबांचा विचार करू लागतो . वाचनाचा छंद जोपासताना आपल्याला ग्रंथालयांचे साहाय्य मिळते . तरीपण काही आवडलेली पुस्तके आपण स्वतः खरेदी करून संग्रही ठेवतो . वाचनाचा छंद असलेल्याला कधीच कंटाळा येत नाही . प्रवासात , एकटे असताना , अगदी दुःखाच्या प्रसंगीही पुस्तके साथ करतात . कदाचित मित्र कंटाळा करील ; एक वेळ आईवडीलही थकतील . पण पुस्तक कधी कंटाळा करीत नाही , थकत नाही . आपल्याला जेव्हा हवी तेव्हा , जिथे हवी तिथे साथ करायला पुस्तके तयार असतात . वाचन आपल्याला बहुश्रुत करते , समृद्ध करते . विशाल जगाचा परिचय करून देते . ' ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरू होत ' , असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे , ते उगाच नाही . म्हणूनच वाचनाचा छंद प्रत्येकाने जोपासला पाहिजे .
Tags:
मराठी निबंध लेखन