प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध
माणसाने आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरू केले , अनेक प्रकारची वाहने शोधून काढली . त्यामुळे वायुप्रदूषण वाढले . माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा . दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात . माणसे , पशू , पक्षी मृत्युमुखी पडतात . कित्येक दुर्मीळ वनस्पती नष्ट होतात . गिरण्या कारखान्यांतील दूषित पाणी नदयांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते . अशा दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे रोगग्रस्त होत आहेत . माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला दूषित करताना माणसाला मात्र थोडीही खंत वाटत नाही . माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटले .
अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणांचा उपयोग सुरू केला ; पण त्यामुळे घनकचरा वाढू लागला . प्लास्टिक कुजत नसल्यामुळे हा कचरा नष्ट होऊ शकत नाही . त्यामुळे प्रदूषण वाढत आहे . शेतातील पिकांवर कीड पडू नये , म्हणून औषधे फवारली जातात . अशा या औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतेच ; पण अशा अन्नधान्यांचा माणसाच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो . हवा व पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण . आपल्याभोवती सतत मोठमोठे कर्कश आवाज होत असतात . कर्कश आवाजात लावलेले कर्णे आसमंताची शांतता नष्ट करतात . त्यामुळे मनाची शांतताही नष्ट पावते .
अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकत नाहीत . एवढेच नव्हे , तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो . त्यांची आयुर्मर्यादा घटते . या सर्व प्रकारच्या प्रदूषणांमुळे माणसाचे आरोग्य बिघडत आहे . एवढेच नव्हे , तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे . माणसाला जिवंत राहायचे असेल , तर प्रदूषण नाहीसे करावेच लागेल .
प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन