श्रमेव जयते मराठी निबंध

श्रमेव जयते मराठी निबंध

श्रमेव जयते मराठी निबंध


          आपल्याकडे शारीरिक कष्टांना कमी महत्त्व दिले जाते . त्यामुळे कष्टाच्या कामांना कमी लेखले जाते . दहावीत किंवा बारावीत गुणवत्ता यादीत येणारे विदयार्थी डॉक्टर होणार , इंजिनीअर होणार ' असे सांगतात . एकही विद्यार्थी ' मी शेतीतज्ज्ञ होणार ' असे सांगत नाही . याचे कारणच हे की , शेतीत शारीरिक कष्ट खूप असतात . एवढेच कशाला ? आपल्या वर्गात बघा काय घडते ते . मूल्यशिक्षणाच्या तासाला साफसफाईचे काम आले की सगळेजण टाळतात . वर्गात पडलेले कागदाचे कपटे आपल्याला उचलायला सांगितले तर काय घडते ? कोणीही हे काम मनापासून करीत नाही . आपण सरांना कसे चकवले , हे मात्र कौतुकाने सांगतात . हे अत्यंत वाईट आहे , घातक आहे .

               आपल्याकडे बुद्धिजीवींना फार महत्त्व आहे . कार्यालयातील कामे , लेखनाशी संबंधित कामे , बुद्धीशी संबंधित कामे ही श्रेष्ठ दर्जाची मानली जातात . या प्रकारच्या कामांची संधी आपल्याला मिळावी , अशी सर्वांचीच इच्छा असते . अशी संधी मिळाली नाही , तर ते निराश बनतात . श्रमजीवी कमी दर्जाचे व बुद्धिजीवी श्रेष्ठ दर्जाचे ही विचारसरणी चुकीची आहे . वास्तविक श्रम ही गोष्ट खूप मोलाची आहे . माणूस व इतर प्राणी यांची तुलना केल्यावर हे कळेल . इतर प्राणी निसर्गात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत , त्या जशाच्या तशा वापरतात आणि जगतात . माणूस मात्र श्रमाच्या साहाय्याने आपले अन्न - वस्त्र तयार करतो , घरे बांधतो . म्हणजेच श्रमामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनला . 

              श्रम केले नसते , तर माणूस इतर प्राण्यांच्या पातळीवरच राहिला असता . श्रमाचे महत्त्व कळण्यासाठी जगात जी थोर माणसे होऊन गेली आहेत त्यांची चरित्रे वाचली पाहिजेत . त्यांच्या चरित्रांवरून हेच दिसेल की त्या माणसांनी आयुष्यभर अपार कष्ट केले . म्हणूनच ती थोर बनली . आज दुर्दैवाने आपण कष्टांना कमी दर्जाचे मानतो . जे श्रमजीवी आहेत . त्यांना फारशी संपत्ती मिळत नाही , त्यांची फारशी भरभराट होत नाही , असे चित्र दिसते आणि बुद्धिजीवी म्हणून काम करणारे खूप पैसा मिळवताना दिसतात . परंतु , श्रम कमी दर्जाचे असतात , हे कारण त्यामागे नाही . 

                आपला समाज तसे समजतो , हे त्यामागील कारण आहे . आपला समाज श्रमांना कमी लेखतो . श्रम करून पोट भरणाऱ्यांना अत्यंत कमी मोबदल्यात समाज राबवून घेत असतो . म्हणून समाजाचा दृष्टिकोनच बदलणे आवश्यक आहे . त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे . एक गोष्ट आपण सदैव लक्षात घेतली पाहिजे , ती म्हणजे , श्रमातून सुखाची निर्मिती होते . दिवाळीत बाजारातून आणलेल्या कंदिलापेक्षा आपण स्वतः घरी केलेला कंदील आपल्याला अधिक आवडतो . कारण त्यात आपले श्रम असतात . जगातील सर्व महान कार्ये माणसाच्या श्रमातून निर्माण झाली आहेत . श्रम करणाराच पुढे जातो . त्याचीच प्रगती होते . तोच अखेरीस विजयी होतो . 

          बुद्धिजीवी व्यक्ती ज्या सुखसोयी उपभोगतात , त्या श्रमजीवींच्या श्रमांतूनच निर्माण होतात . उदाहरणार्थ , प्रासादतुल्य निवासस्थाने . म्हणजे बुद्धिजीवींच्या सुखाचा आधार मुळी श्रमच आहे . त्यामुळेच ' श्रममेव जयते ' हे वचन ' सत्यमेव जयते ' या वचनाइतकेच सत्य आहे .

श्रमेव जयते मराठी निबंध

श्रमेव जयते मराठी निबंध


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post