जेथे अंधश्रद्धेच्या हाका , तेथे ढुंकूनही पाहू नका मराठी निबंध

जेथे अंधश्रद्धेच्या हाका , तेथे ढुंकूनही पाहू नका मराठी निबंध 



          कोकणातील एका खेड्यात नुकतीच घडलेली एक घटना . झाडे लावल्यावर आठ वर्षे उलटली तरी आंबे लागले नाहीत . म्हणून त्या शेतकऱ्याने एक यज्ञ करून बकऱ्याचा बळी दिला . अशीच गाजलेली दुसरी एक घटना . गुप्त धन मिळावे म्हणून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वत : च्या पोटच्या लहान मुलीला बळी देण्याची एक खेडूत तयारी करीत असताना पोलिसांनी त्याला पकडले . अशा या घटनांनी मन उद्विग्न बनते . जग एकविसाव्या शतकात शिरलेले असताना आपल्या समाजात हे असे भयानक प्रकार का घडत आहेत ?

           या अंधश्रद्धेने आपल्या देशाचा घात केला आहे . प्रगतीच्या मार्गात फार मोठे अडथळे निर्माण केले आहेत . आता हेच बघा ना , झाडाला आंबे का लागत नाहीत , हे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा . या बाबतीत सध्या खूप संशोधनही झाले आहे . त्याचा उपयोग करून , खतपाणी घालून पीक सकस व जास्त कसे येईल , हे पाहिले पाहिजे . या मार्गानेच देशाची प्रगती होईल . पण तसे घडत नाही . आजारातून बरे व्हावे म्हणून किंवा परीक्षेत यश मिळावे म्हणून गंडेदोरे बांधणारे कमी आढळत नाहीत . गंड्यादोऱ्यांनी शरीरातील रोगजंतू मरत नाहीत किंवा परीक्षेतील प्रश्नांची उत्तरेही लिहिता येत नाहीत . तरीही लोक गंड्यादोऱ्यांच्या मागे धावतात .

         अशाने त्यांच्या आयुष्यातील दुःखे नष्ट होत नाहीत , संकटे दूर होत नाहीत , अडचणी संपत नाहीत . उलट , त्यात भरच पडते . मग असे लोक नशिबाला दोष देत गप्प बसतात . म्हणजे त्यांच्या आयुष्यात प्रगती होत नाही . आपला समाज मागेच राहतो . अशी ही अंधश्रद्धा म्हणजे आपल्याला मिळालेला फार मोठा शाप आहे . या शापातून मुक्त होण्यासाठी , अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी आपल्याला नेटाने प्रयत्न करायला हवेत आपले प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील , तर प्रथम आपल्याला अंधश्रद्धा म्हणजे काय , हे समजून घ्यावे लागेल . अंधश्रद्धा म्हणजे काय , हे स्पष्टपणे कळले तरच ती नष्ट करणे शक्य होणार आहे . म्हणून अंधश्रद्धा म्हणजे काय , हे आधी आपण समजून घेऊ . या जगात घडणाऱ्या घटना या विशिष्ट निसर्गनियमाने घडतात . निसर्गनियमांविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही . 

        उदाहरणार्थ , पाण्याला उष्णता दिली की विशिष्ट तापमानानंतर पाण्याची वाफ होते , हा निसर्गनियम आहे . हा नियम कोणीही बदलू शकत नाही . कोणत्याही जातिधर्माच्या माणसाने कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी पाण्याला उष्णता दिली तर पाण्याची वाफ होणारच , त्याचे बर्फ होणार नाही . पाण्याला उष्णता न देता केवळ मंत्राने पाण्याची वाफ करतो , असे एखादा म्हणाला तर ते थोतांड असते , हे नक्कीच असे असतानाही एखादयाकडे ही शक्ती आहे , तो उष्णतेशिवाय पाण्याची वाफ करू शकतो , असे आपण मानू लागलो , तशी श्रद्धा बाळगली तर ती अंधश्रद्धा ठरेल . 

          मांजर आडवे गेल्याने काम होत नसेल , तर ही घटना जगभर सर्व माणसांच्या बाबतीत अशीच घडली पाहिजे . ती तशी घडत नाही . म्हणजे तो निसर्गनियम नव्हे . म्हणून ती अंधश्रद्धा ठरते . आपण आता आपली विचारपद्धतीच बदलली पाहिजे . प्रत्येक घटनेमागील कारण आपण शोधले पाहिजे . स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे . अशी वृत्ती आपण जोपासली तरच आपल्याला प्रगती करता येईल . नाहीतर जग पुढे जाईल आणि आपण मात्र मागेच राहू .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post