चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Chandani Ratarichi Sahal Marathi Nibhand

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध - Chandani Ratarichi Sahal Marathi Nibhand

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध - Chandani Ratarichi Sahal Marathi Nibhand

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध

     माझे बाबा व त्यांचे तीन मित्र यांची घनिष्ठ मैत्री आहे. सर्वजण सहकुटुंब एकमेकांकडे जातात - येतात. त्यामुळे चारही कुटुंबांमध्ये मैत्रीचे, स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत. आम्ही सर्वजण वर्षातून एखादी तरी एकत्र सहल करतो. एकदा बाबांच्या मित्रांपैकी कोणीतरी एक आगळी, सुचवले की, 'आपण चांदण्या रात्रीची सहल काढू या'. एकदा एखादी कल्पना मनाला पटली की, ती अमलात आणायला बाबांच्या मित्रांना वेळ लागत नाही.

     आम्ही सहलीसाठी मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमेचा दिवस निश्चित केला. रात्री दहानंतर आम्ही निघालो. पौर्णिमेच्या त्या रात्री आकाश स्वच्छ व निरभ्र होते. डोंगराकडे जाणारा रस्ता माळरानावरून जात होता. तेव्हा त्याच रस्त्याने डोंगर गाठायचा, असे आम्ही ठरवले. सारे गाव आकाशाची दुलई पांघरून शांतपणे झोपले होते. रात्र पौर्णिमेची असल्याने आज रस्त्यावरचे दिवे लावले गेले नव्हते की काय, कोण जाणे! मात्र त्यामुळे चांदण्याचे सौदर्य आम्हांला अनुभवता आले. चांदण्याला 'पिठूर' म्हणणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची असावी! मे महिन्याचे दिवस असूनही शीतल चंद्रप्रकाशामुळे हवेतील सौम्य गारवा मनाला सुखावत होता. त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. बागांतून फुललेल्या रातराणीमुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. अशा प्रसन्न वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल! चांदण्यात न्हाऊन निघत असताना आम्ही डोंगरमाथ्यावर केव्हा पोहोचलो, ते कळलेदेखील नाही.

       डोंगरमाथ्यावरील दृश्य विलोभनीय होते. दिवसा ओक्याबोक्या दिसणाऱ्या डोंगरांनी रुपेर शाल पांघरली होती. करवंदांच्या जाळ्यांवर जणू चांदीची फुलेच फुलली होती. मातीचा स्पर्शही मुलायम वाटत होता. धरतीवर चांदण्याच्या जणू सरी पडत होत्या. आकाशातील पूर्ण चंद्राला कवी कुसुमाग्रजांनी 'स्वप्नांचा सौदागर' असे का संबोधले असावे, ते उमगले. माझ्या बाबांना हे सांगितले, तेव्हा त्यांच्या मित्रांच्याही मनात काही गीतांच्या ओळी जाग्या झाल्या. कुणाला 'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' ही ओळ आठवली, तर कुणाला 'रात का समा झुमे चंद्रमा' ही हिंदी चित्रपट गीतातील ओळ आठवली आणि मग पाहता पाहता चांदण्यासंबंधीच्या गाण्यांचा पूर लोटला. आमचा मित्र सुधाकर याने 'पुनवेचा चंद्रम आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी' हे गाणे सुरेल आवाजात म्हटले. रात्री करवंदांच्या जाळीत शिरणे धोक्याचे असल्याने 'डोंगरची काळी मैना' दुरूनच पाहावी लागली; पण त्यामुळे भुकेची आठवण झाली. आम्ही रसिकतेने फराळाची निवड केली होती

      रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेले पदार्थही तसेच होते. पांढरी स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकीफुलकी इडली आणि मस्त, मऊ दहीभात ! चांदण्यात रात्रभर विहरत असताना दुःख, द्वेष, असूया, चिंता हे सारे विकार विरून गेले होते. ही सारी किमया होती त्या धवल चांदण्याची ! चांदीच्या रसात जणू चराचर न्हात होते. यापूर्वी आम्ही अनेक सहली काढल्या, पुढेही काढू; पण चांदण्या रात्रीच्या त्या सहलीची मौज अगदी वेगळीच!

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध - Chandani Ratarichi Sahal Marathi Nibhand

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध - Chandani Ratarichi Sahal Marathi Nibhand

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post