अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

      आजवर मी अनेक सहलीना गेलो आहे; पण या सर्व सहलींपैकी कॉर्बेटच्या अभयारण्यातील आमची सहल मला संस्मरणीय वाटते. एके दिवशी बाबांच्या वाचनात आले- जगातील सर्व प्राण्यांत अतिशय देखणा आणि स्वच्छ म्हणून ओळखला जाणारा वाघ हा प्राणी हळूहळू नामशेष होत आहे. पृथ्वीवरील वाघांच्या एकूण आठ जातीपैकी तीन जाती तर केव्हाच नष्ट होऊन गेल्या आहेत आणि उरलेल्या पाच जातीही कशाबशा तग धरून जगताहेत. बाबांनी लगेच ठरवले, 'चला, आपण वाघोबांच्या भेटीला जायचे. त्यांनी सर्व माहिती मिळवली आणि 'जिम कॉर्बेट पार्क' ला जाण्याची आमची तयारी झाली. भारतीय उपखंडातील सर्वांत जुना म्हणून ओळखला जाणारा हा पार्क ६ ऑगस्ट १९३६ रोजी निर्माण केला गेला. त्या वेळी त्याचे नाव होते 'नॅशनल पार्क.' पण नंतर जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५७ साली या पार्कचे नाव झाले-'जिम कॉर्बेट पार्क.

     ' हौशी शिकारी व वाघाच्या कातड्यांना येणारी प्रचंड किंमत यांमुळे या पार्कमधील बऱ्याच वाघांची शिकार झाली. म्हणून त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खास अध्यादेश काढून १ एप्रिल १९७३ रोजी वाघांच्या शिकारीवर बंदी घातली आणि हे 'अभयारण्य' साकार झाले. आम्ही नवी दिल्लीहून अभयारण्याकडे गेलो. तेथील टायगर रिझर्व्हच्या लॉजमध्ये उतरलो. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अभयारण्याच्या सफरीला निघालो. हत्तीच्या पाठीवरील छोट्या अंबारीत बसून पार्क पाहण्यात एक वेगळीच मौज आम्ही अनुभवली. सतत चार दिवस आम्ही त्या अभयारण्यात हिंडलो; पण तरी खूप काही पाहायचे राहून गेले. 

     कारण या पार्कचा विस्तार १३१८ चौरस किमी आहे. या उदयानाच्या मुख्य दरवाजावर जीम कॉर्बेट या थोर व्यक्तीचा पुतळा आहे आणि त्यांच्या वापरातल्या वस्तूंचे संग्रहालयही आहे. या जंगलात केवळ वाघांचेच वास्तव्य नाही; तर सुळे असलेल्या जंगली हत्तींचे कळप, चितळ, काळ्या तोंडांची माकडे, सांबर, कोल्हे, सुसरी, मगरी आणि अनेक प्रकारचे पक्षी आहेत. किती पाहावे आणि काय काय पाहावे, हेच उमगत नव्हते. अनेक झाडांवर निरीक्षणासाठी 'वॉच टॉवर्स'ही उभारण्यात आले आहेत

    हत्तीवरून फिरताना जंगलात खूप आतपर्यंत जाता येते आणि शेवटी या भ्रमंतीत आपणही त्या जंगलाचाच एक भाग बनून जातो. या अभयारण्यातील निसर्ग प्रसन्न आहे. नाना त-हेची वृक्षवल्ली येथे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सुखात बहरत आहेत. ती विविधता पाहूनही मन दिङ्मूढ होते. पण त्या अभयारण्याचा निरोप घेताना माझे मन मात्र काहीसे खटू झाले. हे अभयारण्य, त्याच्या प्रवेशासाठी कडक नियम आणि एवढा कडेकोट बंदोबस्त का करावा लागला? तर माणसाच्या नतद्रष्ट स्वभावामुळेच ना ! सहलीच्या आनंदाबरोबरच या विचाराने अस्वस्थ होऊन मी बाहेर पडलो. ' जगा आणि जगू दया' हे सत्य माणूस केव्हा स्वीकारणार?

अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post