आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | Marathi Nibandh Aamchi Sahal

एक संस्मरणीय सहल किंवा गोष्ट आमच्या सहलीची | आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | Marathi Nibandh Aamchi Sahal

एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध Marthi Nibhand

एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध 

     आतापर्यंत शालेय जीवनातील अनेक सहलींना मी जाऊन आलो; पण लक्षात राहिली ती चौथीतील 'अर्नाळ्याची' सहल. चौथीत आम्ही सगळेच अजाण होतो. आई बाबांपासून जास्त वेळ दूर राहण्याची सवय नव्हती. पण सहलीला जाण्याचा आनंद काही औरच असतो ! केवढे बेत केले होते आम्ही सर्व मित्रांनी! एकदाचा सहलीचा दिवस उजाडला. भल्या पहाटेच आम्ही शिरा, पुरी, बटाट्याची भाजी, पाण्याची बाटली, बिस्किटे, गोळ्या, खेळायला पत्ते आणि इतर काही खेळांची साधने अशा सर्व सामग्रीनिशी शाळेच्या आवारात जमलो. सर्वांचे पालक हजर होते. त्यामुळे खूप गर्दी जमली होती. पण आम्हांला नेणाऱ्या बसचा बराच वेळ पत्ताच नव्हता. त्यामुळे सारेजण हिरमुसले होते. सहलीची सांगता येथेच होणार की काय, अशी भीती वाटत असतानाच बस आली

      आई-बाबांचे निरोप घेता घेता बस केव्हा सुटली, ते कळलेही नाही. बसमध्ये आमचा आनंद ओसंडून वाहत होता. गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यांत आम्ही दंग होतो. रस्त्याच्या दुतर्फा केळ्यांच्या बागा दिसायला लागल्या, तेव्हा सहलीचे ठिकाण जवळ आल्याचे उमगले. गाडीतबाईंनी एवढा खाऊ दिला की, आम्ही आणलेला खाऊ खाण्याची वेळच आली नाही. आम्ही अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरलो. वाळूतून धावताना मजा वाटत होती. आजूबाजूला मच्छिमार बांधवांची घरे होती. बांबूंनी बांधलेल्या सांगाड्यांवर त्यांनी मासे वाळत टाकले होते. आम्ही उत्सुकतेने किल्ला पाहण्यासाठी गेलो. परंतु किल्ल्याचे भग्नावशेष तेवढे उरले होते

       खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डबे उघडले. सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती. दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती. एका देवळात आम्ही उतरलो होतो. मंदिरापुढे मोठे अंगण होते. लपाछपीचा डाव रंगात आलेला असतानाच बसच्या इंजिनात काहीतरी बिघाड झाल्याची बातमी आली. सर्वांचे चेहरे उतरले. आई काळजी करील, या विचाराने मीही घाबरून गेले. काळोख पडला. आम्ही सर्वजण देवळात बसलो होतो. बसची दुरुस्ती चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जायचे, असे ठरले. पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात बरेचसे गावकरी देवळात आले. त्यांनी भरपूर भात व गरम पिठले आणले होते.  
    
   पत्रावळीवर आम्ही तो गरम गरम भात व पिठले खाल्ले. गावातील एका व्यापाऱ्याने सतरंज्या, जाजमे, चादरी पाठवल्या. गावातील मुलांशी गप्पा मारता मारता आम्हांला केव्हा झोप लागली, हे कळलेच नाही. सकाळी बाईंनी हाका मारल्यावर जाग आली. गावकऱ्यांनी दिलेला चहा, बटर घेऊन बसमध्ये बसलो. गावकऱ्यांच्या त्या प्रेमळ पाहुणचारामुळे आमची सहल संस्मरणीय ठरली.

एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post