खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध - khedatale lokjivan marathi nibhand

खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध - khedatale lokjivan marathi nibhand

खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध

खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध

       आपला देश हा खेड्यांचा देश आहे आणि याचा आपल्याला एकेकाळी अभिमान होता. पण आज काय आढळतं? शहरे फुगत चालली आहेत आणि खेडी ओस पडत चालली आहेत. असे का होते? एक काळ असा होता की, आपली खेडी ही स्वयंपूर्ण होती; स्वबळावर जगत होती. त्यांच्या सर्व गरजा स्थानिक उत्पादनांद्वारेच भागत होत्या. त्यामुळे खेड्यातले लोकजीवन सुखाचे होते.

        या सुखात मिठाचा खडा पडला. शहरे निर्माण होऊ लागली. तेथे पैशांची झगमग वाढली. तेथील जीवनात वैभव आले, चैन आली. थोड्या कष्टावर जगता येऊ लागले. याउलट खेड्यातील उदयोगधंदे बंद पडले. अतिवृष्टी, अवर्षण, अवेळी पाऊस, पिकांवर पडणारे रोग अशा नाना आपत्तीमुळे शेतकरी संकटात येऊ लागला आणि कर्जबाजारी होऊ लागला. पूर्वी आपल्या खेड्यांमध्ये पराकोटीची विषमता होती. उच्चनीचता होती. गावात जमीनदार, सावकार असत. कुणी खोत, कुणी कुळे. परंतु ते एकमेकांच्या गरजा भागवत असत.

      गावातील बारा बलुतेदार गावाच्या गरजा भागवत. त्या बदल्यात गाव त्यांना उपजीविकेला आवश्यक ते अन्नधान्य देई. अशा प्रकारे सर्वांचे जीवन एकमेकांवर अवलंबून होते. सर्वजण एकमेकांशी घट्ट बांधलेले होते. त्यांतला एक घटक जरी वगळला गेला, तरी गावाच्या जीवन व्यवहारांत अडथळे येत. त्यामुळे सगळेजण एकमेकाला सांभाळून घेत. याच कारणाने गावातले भावजीवन सुस्थिर होते. आता तसे राहिले नाही. शहरात तयार झालेल्या वस्तू गावात जातात. यंत्रावर तयार झालेले कपडे, वहाणा व इतर वस्तू खेड्यात जातात. त्यामुळे खेड्यातील उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. शेती पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. एक व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले जात नाही. त्यामुळे शेतीतून योग्य उत्पन्न मिळत नाही. इतर काही उदयोग नसल्यामुळे बेकारी निर्माण झाली आहे. लहान शेतकरी तर कर्जबाजारीच होत आहे. 

      अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजाही नीट भागत नाहीत. वरील परिस्थितीचा परिणाम संपूर्ण ग्रामीण जीवनावरच होत आहे. शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. आरोग्यसेवा अत्यंत खालावलेल्या अवस्थेत आहे. रस्ते व इतर दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नाहीत. जी आहेत, ती चांगल्या स्थितीत नाहीत. साहजिकच अज्ञान, दुःख, दैन्य व दारिद्र्य यांनी ग्रामीण जीवन व्यापले आहे. लोक हतबल होऊन दैववादी बनत आहेत. त्यामुळे विकासाकडे जाण्याची ऊर्मीच दुबळी होत आहे. शहरात सर्व आर्थिक सुबत्ता एकवटल्यामुळे लोक शहरांकडे आकर्षित होत आहेत. 

     शहरी जीवनाचे अनुकरण करीत आहेत. श्रमप्रतिष्ठा लोप पावत आहे. पांढरपेशा जीवनाची ओढ निर्माण होत आहे. यामुळे शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. ग्रामीण जीवनात आपत्तींची साखळीच निर्माण होत आहे. खेड्यातील जीवन म्हणजे रमणीय, निर्मळ व सुखी जीवन ही कल्पना केव्हाच बाद झाली आहे. आता आपल्याला त्वरेने खेड्यांकडे लक्ष दयावे लागेल.

खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध

खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध - khedatale lokjivan marathi nibhand

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post