मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध
यंदाच्या सुट्टीत मी बाबांकडे महाराष्ट्रातील काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आईनेसुद्धा ही कल्पना उचलून धरल्यामुळे मी, ताई, बाबा व आई मिळून 'वेरूळची लेणी' पाहायला जाण्याचा बेत आखला. आम्ही खाजगी गाडीतून वेरूळला पोहोचलो. वेरूळ हे प्रसिद्ध आहे ते तेथील लेण्यांसाठीच! एका बाजूला उंच उंच डोंगरकडे आणि दुसऱ्या बाजूला खोल दया. वरून खाली नजर टाकली, तर भीतीने डोळेच फिरतात.
कड्यांच्या बाजूला नजर टाकली, तर मानवी कर्तृत्वाचे दर्शन घडून दृष्टी स्तिमित होते. हे कर्तृत्व कोणाचे? कोणी हे डोंगर खोदले? काही नोंद नाही. ती अप्रतिम कला निर्माण करणाऱ्याने कोठेही आपले नाव कोरून ठेवले नाही. या लोकांना कलानिर्मितीची धुंदी होती. स्वतःचे नाव वा स्वतःची प्रसिद्धी यांची मातब्बरी वाटत नव्हती. वेरूळच्या लेण्यांचा हा समूह एक असाधारण समूह आहे. येथे पस्तीस लेणी आहेत. दीड मैल लांबीच्या डोंगरात कोरलेल्या या लेण्यांत बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तिन्ही धर्मांची लेणी आहेत.
सुरुवातीलाच दर्शन घडते, ते बौद्ध लेण्यांचे. ही सर्वांत जुनी लेणी आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भव्यता आणि साधेपणा. त्यानंतर लागतात, हिंदू लेणी. या सर्व लेण्यांतील महत्त्वाचे लेणे म्हणजे सोळावे लेणे-'कैलास लेणे.' हिंदू लेणी बौद्ध लेण्यांपेक्षा खूप वेगळी आहेत. हिंदूंच्या पुराणातल्या देवदेवतांचे दर्शन येथे घडते. येथील शिल्पांचे स्वरूपही बौद्ध लेण्यांपेक्षा वेगळे आहे.
कैलास लेण्यात प्रवेश करतानाच समोर लाटांचे नर्तन चाललेल्या जलाशयात कमलासनावरील गजलक्ष्मी दिसते. डावीकडे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या सुंदर, प्रसन्न मूर्ती दिसतात. तेथे एक प्रचंड हत्ती आहे. संपूर्ण डोंगर वरपासून खालपर्यंत कोरून हे लेणे तयार केलेले आहे. कलावंत-कारागिरांनी घडवलेले ते शिल्प पाहून आपण स्तिमित होतो. त्या गुहेत अशी एकही जागा नाही, की जेथे कोरीव मूर्ती नाही, नक्षी नाही. आज हजार बाराशे वर्षे या मूर्ती उन्हा-पावसाचा, थंडी वाऱ्याचा मारा सहन करीत आहेत; पण त्यांची भव्यता, त्यांचा रेखीवपणा, जिवंतपणा तसूभरही कमी झालेला नाही.
शेवटची चार-पाच लेणी जैनांची आहेत. त्यांचे वळण पुन्हा वेगळे आहे. त्यांत इंद्र, इंद्राणी, तीर्थंकर, लंबोदर, कुबेर यांच्या मूर्ती आहेत. हे सारे वैभव पाहताना एका गोष्टीने मात्र मन व्यथित झाले. काही ठिकाणी काही अतिउत्साही प्रवाशांनी आपली नावे वेडीवाकडी आणि कुरूपतेने खोदलेली आहेत. त्यांना केशवसुतांच्या शब्दांत सांगावेसे वाटते,
"प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा,
निजनामे त्यावरती नोंदा.'
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन