अशी हवी शाळा किंवा माझ्या कल्पनेतील आदर्श शाळा मराठी निबंध
अशी हवी शाळा मराठी निबंध
शाळा, विदयार्थी आणि शिक्षण ही ज्ञानाची त्रिवेणी आहे. ज्ञानमंदिराचा पाया म्हणजे शालेय शिक्षण. शाळा ही मुलांची दुसरी माता असते. ही शाळा आदर्शवत कशी असेल, याबाबत माझी कल्पना मांडतो. माझ्या या कल्पनेतील शाळेची इमारत उंच नसेल, पण तिचा मोठा विस्तार असेल. तिच्यावर लाल सुंदर कौले असतील आणि तिच्यासमोर विस्तीर्ण पटांगण असेल.
माझ्या मनातील शाळेतील मुले शाळेत गेल्या गेल्या आपले दप्तर वर्गात ठेवून मैदानावर धावतील. कारण तेथे भरपूर खेळ आणि त्या खेळांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उपस्थित असतील. आपल्याला आवडेल तो खेळ आपण खेळावा; पण खेळायचे मात्र खेळाच्या नियमांनुसार, शिस्तीने. ज्यांना खेळाची आवड नसेल त्यांची पावले ग्रंथालयाकडे वळतील. माझ्या कल्पनेतील आदर्श शाळेतील ग्रंथालयाच्या कपाटांना कुलपे नसतील. ज्याला जे हवे ते पुस्तक त्याने काढावे आणि वाचायला लागावे.
माझ्या कल्पनेतील आदर्श शाळेत वर्गात विदयार्थ्यांची गर्दी नसेल. वर्ग हवेशीर व भरपूर प्रकाश असणारा असेल. प्रत्येक मुलाला बसायला स्वतंत्र डेस्क, पुढे कपाट असलेले मेज. म्हणजे विदयार्थ्यांना आपल्या पुस्तकांचे ओझे रोज वाहावे लागणार नाही. ते आपली पुस्तके, इतर शैक्षणिक साधने आपल्या कपाटात ठेवतील आणि जेवढे आवश्यक असेल तेवढेच साहित्य घरी नेतील.
माझ्या कल्पनेतील या आदर्श शाळेत अभ्यासक्रम निश्चित असेल, पण तो पूर्ण करण्याची रटाळ धडपड नसेल. शिक्षकांकडून सर्व काही भरवल्यासारखे-'स्पून फीडिंग'-शिकवले जाणार नाही. विदयार्थी स्वतः अभ्यास करतील, वाचन करतील. त्यात त्यांना काही अडचणी आल्या तर शिक्षक मार्गदर्शन करतील. या पद्धतीने विद्यार्थी परीक्षार्थी होणार नाही; ते खऱ्या अर्थाने विदयार्थीच राहतील.
आजच्या शाळा केवळ परीक्षा घेण्यासाठीच आहेत, असे वाटते. माझ्या कल्पनेतील आदर्श शाळेत अशा परीक्षा हद्दपार होतील. विदयार्थ्याने केलेल्या स्वयं-अध्ययनाचे शिक्षक वेळोवेळी परीक्षण करतील आणि त्याला पुढचा मार्ग दाखवतील.अशी माझ्या कल्पनेतील आदर्श शाळा उत्तम प्रयोगशाळा, भूगोल कक्ष, चित्रकला कक्ष, संपन्न ग्रंथालय यांनी परिपूर्ण असेल. खरा विदयार्थी तेथे ज्ञानसाधना करील आणि ज्ञानसंपन्न होईल. अशा शाळेत या ज्ञानार्थीला ज्ञानसमृद्ध करण्यात अध्यापकांचीही कसोटी, लागेल, हे नक्कीच!
अशी हवी शाळा किंवा माझ्या कल्पनेतील आदर्श शाळा मराठी निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन