मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा मराठी निबंध - Mi pahilēlā nisargaramya dēkhāvā marāṭhī nibandha

मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा मराठी निबंध - Mi pahilēlā nisargaramya dēkhāvā marāṭhī nibandha

मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा मराठी निबंध

मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा


    आमच्या घरात सर्वांनाच प्रवासाची खूप आवड, त्यामुळे दरवर्षी कुठे ना कुठे आम्ही सहलीला जात असतो. नवीन नवीन ठिकाणे शोधून काढण्यात आमच्यात जणू स्पर्धा लागते. यंदा डिसेंबरात अगदी छोटीशी चार दिवसाची सहल आम्ही आयोजित केली. कुठे माहीत आहे ? मालदीव बेटांवर. एवढ्याशा या लहान बेटांवर आपण चार दिवस काय करणार? अशी शंकेची पालही मनात चुकचुकली. मालदीवमधील एलाडो बेटावर जायचे ठरले. त्यासाठी श्रीलंकन एअरवेजची निवड केली. 

    श्रीलंकेचा किनारा ओलांडून मालदीवकडे निघालो. समुद्राच्या पाण्यात घुसलेल्या चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्यावर धावपट्टी बांधली होती. तेथून एअर टॅक्सी घेतली. एअर टॅक्सी म्हणजे १२ आसनांचे छोटेसे विमान. या विमानाला चाकांच्या जागी छोटी होडी जोडलेली होती. निसर्ग किती रम्य असू शकतो याचा अनुभव 'एलाडो' बेटावर घेऊन जाणाऱ्या विमानात बसल्यापासून येत होता. खाली दिसणाऱ्या पाण्याच्या रंगाच्या विविध छटा पाहून मन हरखून जात होते. जांभळे, निळे, हिरवे असे विविध रंग पाण्याने परिधान केले होते. त्यांत ती चिमुकली बेटे ! प्रत्येक बेटाभोवती प्रवाळांच्या रांगा उठून दिसत होत्या

    विमानातून उतरून आम्ही मोटारबोटीत बसलो आणि एलाडो बेटाकडे निघालो. समोर जो किनारा दिसत होता त्यावरची वाळू शुभ्र होती. अशी शुभ्र वाळू यापूर्वी मी कधीच पाहिली नव्हती. किनाऱ्याच्या सर्व बाजूंनी नारळाची झाडे. त्यामुळे त्या शुभ्रतेवर हिरव्या पाचूचा हार घातला आहे, असे वाटत होते. ते दृश्य पाहताना प्रवासाचा थकवा तर राहिला नव्हताच; पण तहानभूकही उरली नव्हती. तेथील वाळू एवढी मुलायम, मऊशार होती की अनवाणी चालणेच खूप सुखद वाटत होते. दुपारी पाण्याखालची दृश्ये पाहण्याचे ठरले. त्यासाठी खास जामानिमा केला. डोळ्यांवर घट्ट चष्मा. तोंडाला जोडलेल्या नळीतून श्वास घ्यायचा एवढं सगळं परिधान करून आम्ही प्रवाळ बघायला निघालो आणि तृप्त झालो. 

    सप्तरंगाची, विविध आकारांची तेथे उधळण होती. त्या प्रवाळांतून हिंडणाऱ्या माशांच्या झुंडीही विस्मयकारक होत्या. माशांचे रंग व आकार विस्मयीत करणारे होते. ते सारे दृश्य पाहून आम्ही थक्कच झालो. निसर्ग हाच श्रेष्ठ किमयागार आहे, हे सत्य जाणवले. मालदीवच्या सूर्यास्ताच्या दृश्याने तर आम्हांला वेडे केले. या बेटावर चार दिवस काय करणार, हा प्रश्न पडलेल्या आम्हांला चार दिवस फारच अपुरे वाटले.

मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा मराठी निबंध - Mi pahilēlā nisargaramya dēkhāvā marāṭhī nibandha

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post