कलावंत नसते तर मराठी निबंध | kalavant naste tar marathi nibandh
कलावंत संपावर गेले तर किंवा कलावंत नसते तर
दहावीची परीक्षा अगदी तोंडावर आली होती. आमच्या इमारतीत आम्ही सातआठ जण दहावीच्या परीक्षेला बसणारे होतो. आम्हा सगळ्यांच्या घरी धीरगंभीर आणि काहीसे ताणतणावाचे वातावरण होते आणि तेवढ्याच अवधीत एक बातमी आली... जवळच्याच एकासभागृहात कुठल्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन येणार आहेत ! झाले ! आमच्या परिसरात उत्साहाला एकच उधाण आले! आम्हा दहावीवाल्यांच्या जिवानेही उचल खाल्ली. आम्ही आमच्या आईबाबांजवळ तगादा लावायला सुरुवात केली. आणि मग काय...!
आमच्या आईबाबांच्या संतापाचा स्फोटच झाला ! आम्हांला उपदेश करून, समजावून सांगून ते थकले. मग रागारागानेच उद्गार काढू लागले... या कलावंतांनी विदयार्थ्यांना पार बिघडवून टाकले आहे. हे कलावंत नसते तर खूप बरे झाले असते ! जगातले सर्व लोक केव्हा ना केव्हा संपावर जातात. पण कलावंत मात्र संपावर जात नाहीत. हे कलावंत नसते, निदान संपावर गेले असते, तर फार फार उपकार झाले असते ! माझ्याही मनात आले की, खरोखर, कलावंत नसते तर? ते संपावर गेले तर? तर... तर... कला पोरकी होईल. माणसाचे जीवन नीरस, रूक्ष होईल. सौंदर्य, कोमलता, भव्यता या सर्व उदात्त गुणांना पारखे झाल्यावर माणसाच्या कलाहीन जीवनाला 'जीवन' का म्हणावे, असाच प्रश्न पडेल. जेव्हा माणूस चंद्रावर पोहोचला तेव्हा शास्त्रज्ञ सांगू लागले की, चंद्र हा भाजलेल्या पापडासारखा आहे.
त्याच्यावर 'सुधा' कुठली, साधे पाणीही नाही. पण आमच्या कवी कुसुमाग्रजांनी सांगितले, 'छे, छे, शास्त्रज्ञांचा चंद्र वेगळा आहे आणि कलावंतांचा चंद्र वेगळा आहे. तो मानवाच्या स्वप्नांचा सौदागर आहे.' असे हे कलावंत शून्यातून स्वर्ग निर्माण करणारे आहेत. हे संपावर गेले तर या सुंदर जगाचे रौरव नरकात रूपांतर व्हायला कितीसा वेळ लागेल? कलावंत संपावर गेले, म्हणजे नवनवीन चित्रपटांची मौजमजा अनुभवता येणार नाही. जुने नवे कोणतेही नाटक पाहायला मिळायचे नाही. इतकेच काय, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या बंद पडतील. केवळ बातम्यांच्या वाहिन्या चालू राहतील. म्हणजेच कलावंत संपावर गेले, तर जीवनातील ताजेपणाच हरवून जाईल.
कुसुमाग्रजांची कविता असो, डॉ. लागूंचा नाट्याभिनय असो, अजिंठ्याची लेणी असोत वा एखादया नर्तिकेचा पदन्यास असो; रसिक तिचा पुनःपुन्हा आस्वाद घेतो आणि प्रतिक्षणी त्याला नवा आनंद अनुभवता येतो. कलावंत संपावर जाताच हे सारे लयाला जाईल. म्हणून तर केशवसुत मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते'आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!'
कलावंत नसते तर मराठी निबंध | kalavant naste tar marathi nibandh
Tags:
मराठी निबंध लेखन