उपसर्गघटित शब्द - प्रत्ययघटित शब्द अभ्यस्त शब्द
(१) उपसर्गघटित शब्द :
पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
उपसर्ग घटित शब्द उदाहरण
(१) सु + विचार ⇒सुविचार (चांगला विचार)
(२) दर + रोज ⇒ दररोज (प्रत्येक दिवस)
• 'विचार' या शब्दाआधी 'सु' हे अक्षर आले आहे.
• 'रोज' या शब्दाआधी 'दर' हा शब्द आला आहे.
- शब्दाच्या आधी लागलेल्या शब्दांना उपसर्ग म्हणतात.
- शब्दांच्या आधी अक्षर किंवा शब्द लागून जे नवीन शब्द
तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात. म्हणून, 'सुविचार' व 'दररोज' हे उपसर्गघटित शब्द आहेत.
काही उपसर्गघटित शब्द : अपमान, आजन्म, अनुक्रम, प्रतिबिंब, आडनाव, निरोगी, गैरहजर, बिनचूक, बेजबाबदार इत्यादी.
(२) प्रत्ययघटित शब्द :
• पुढील शब्द लक्षपूर्वक अभ्यासा :
प्रत्ययघटित शब्द उदाहरण
(१) रस + इक → रसिक
(२) झोप + आळू → झोपाळू
- 'रस' या शब्दामागे 'इक' हा शब्द लागला आहे.
- 'झोप' या शब्दामागे 'आळू' हा शब्द लागला आहे.
शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किंवा शब्दांना प्रत्यय म्हणतात.
शब्दांच्या मागे अक्षर किंवा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
म्हणून, 'रसिक' व 'झोपाळू' हे प्रत्ययघटित शब्द आहेत. काही प्रत्ययघटित शब्द : लेखक, पथिक, कर्तव्य, शिलाई, पुजारी, लाजाळू, रेखीव, भांडखोर, शेतकरी, दळणावळ, हसरा इत्यादी.
(३) अभ्यस्त शब्द :
• अभ्यस्त म्हणजे पुनरावृत्ती (पुन्हा पुन्हा येणे) होय. जे शब्द दोनदा येतात किंवा पुनरावृत्त होतात व नवीन जोडशब्द तयार होतो, त्यास अभ्यस्त शब्द म्हणतात.
• अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत :
(अ) पूर्णाभ्यस्त
(आ) अंशाभ्यस्त
(इ) अनुकरणवाचक.
(अ) पूर्णाभ्यस्त शब्द : एक शब्द पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो.
उदा,. लाललाल, मधूनमधून, समोरासमोर इत्यादी.
(आ) अंशाभ्यस्त शब्द : एखादे अक्षर बदलून तोच शब्द पुन्हा येतो.
उदा., नोकरीबिकरी, शेजारीपाजारी, गोडधोड इत्यादी.
(इ) अनुकरणवाचक शब्द : काही ध्वनिवाचक शब्द पुन्हा mपुन्हा (पुनरावृत्त) होतात.
उदा., गडगड, बडबड, किरकिर, कडकडाट इत्यादी.
Tags:
मराठी व्याकरण