गुरुभक्त लेहना मराठी कथा
एकदा गुरु नानकांची कीर्ती ऐकून त्यांचा अनुग्रह घ्यावा व गुरुकृपा प्राप्त करावी या हेतूने 'लेहना' नावाचा शिष्य त्यांच्याकडे आला. गुरुनानक त्यावेळी शेतात काम करीत होते. गुरांना चारा हवा म्हणून त्यांनी शेतात गवंताचे तीन भारे बांधून ठेवलेले होते. त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता.
गुरु नानकांनी आपल्या मुलांना ते तीन भारे घरी नेण्यास सांगितले; पण त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांची आज्ञा ऐकली नाही. लेहनाने गुरुदेवांचा आदेश ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता हे तिन्ही भारे घरी आणले. अंगावरचे नवीन कपडे चिखलाने भरले. परंतु लेहनावर मात्र गुरुसेवेचा रंग चढला.
गुरुनानकांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. एकदा त्यांच्या घरापुढील भिंत कोसळली. बाहेर पाऊस कोसळत होता कडाक्याची थंडी पडली होती. रातोरात ती भिंत बांधली जावी असा आदेश गुरु नानकांनी दिला. त्यांची मुले आणि इतर शिष्य गवंड्याचा शोध घ्यायला निघाले; परंतु लेहनाने लगेच कुदळ फावडे घेतले.
चिखल कालवला. रातोरात ती भिंत बांधून काढली. नानकदेवांनी भिंत पाहून म्हटले, "अरे ही काय भिंत आहे? पाडून टाका ती!'' लेहनाने पुन्हा नव्याने ती भिंत बांधली. गुरु नानकांनी पुन्हा ती पाडायला लावली.
असे तीन वेळा झाले. पण लेहनाच्या चेहऱ्यावर कोणताही त्रागा किंवा कंटाळा दिसला नाही. अशी अनेकदा खडतर परीक्षा पाहून गुरुदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याचे लेहना हे नाव बदलून 'अंगद' असे ठेवले. हेच अंगद पुढे 'गुरु अंगददेव' म्हणून शीख सांप्रदायाचे दुसरे गुरु म्हणून नावारुपास आले.
गुरुभक्त लेहना मराठी कथा | मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi | बोध कथा
Tags:
मराठी गोष्टी