एका पैशाची चूक मराठी कथा
मध्यरात्र उलटून गेली होती. गडाचे किल्लेदार स्वामी जनार्दनपंत टेहळणीसाठी निघाले. सगळीकडे सामसूम होती; परंतु एका खोलीत दिवा जळत असलेला त्यांनी पाहिला. एवढ्या रात्री कोण जागा आहे है पाहण्यासाठी ते खोलीजवळ गेले. त्यांचा एक शिष्य कसलीतरी आकडेमोड करत होता. हळूच दरवाजा उघडून ते आत गेले. आणि त्याची गंमत पाहत मागे उभे राहिले.
त्या शिष्योत्तमाला तल्लीनतेने आकडेमोड करत असताना पाहून पंताना मोठं नवल वाटलं. थोड्या वेळाने अत्यानंदाने टाळी वाजवत तो शिष्य ओरडला "सापडली!" जनार्दनपंतांनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, "बाळा, काय सापडली?" शिष्य म्हणाला, "गुरुजी चूक सापडली, हिशोबात एक पैशाची चूक सापडली.
गुरुजी म्हणाले, "अरे वेड्या, एक पैशाची चूक शोधण्यासाठी तू रात्रभर जागत राहिलास?" शिष्य म्हणाला, "गुरुदेव, ही तर आपलीच शिकवण आहे, की गुरुने दिलेलं काम पूर्णत्वाला नेणं हे शिष्याचं आद्य कर्तव्य आहे! हिशोब जर नीट झाला नसता तर सकाळी मी कोणत्या तोंडाने आपल्यासमोर उभा राहू शकलो असतो?" नऊ दहा वर्षांच्या त्या कोवळ्या शिष्योत्तमाचे ते उत्तर ऐकून जनार्दनपंत गहिवरले.
प्रेमाने त्याला कवटाळत ते म्हणाले, "नाथा, तुझी गुरुनिष्ठा पाहून मी धन्य झालो. एक दिवस सारा संसार तुझं गुणगान करील, तुझ्या गुरुचाही लौकिक वाढेल.' गुरुदेवांच्या आशीर्वादासाठी तळमळणारा हा शिष्य धन्य झाला.
गुरुदेवांच्या चरणावर आपल्या अणूंचा अभिषेक घालून त्यांचे चरण धुवू लागला. जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि गुरुभक्ती या गुणांची अत्यंत गरज असते.
ही शिकवण देणारा हा बाल शिष्य म्हणजे, आपले "संत एकनाथ महाराज!" संत समुदायात ज्यांना "शांतीब्रह्म' म्हणून ओळखतात त्या संत एकनाथांनी आपल्या लेखनात स्वत:बरोबरच गुरुचाही उल्लेख कायम केला. त्यांच्या प्रत्येक ओवीत अंतीम चरणात "एका जनार्दनी" असो उल्लेख करुन त्यांनी गुरुचेही नाव उज्ज्वल केले.
एका पैशाची चूक मराठी कथा - Marathi Goshti गोष्टी | Chan Chan Goshti | Marathi Story |
Tags:
मराठी गोष्टी