संस्कार मराठी कथा - Sanskar Katha in Marathi | Marathi Katha | Stories in Marathi

संस्कार मराठी कथा - Sanskar Katha in Marathi

एकदा एक मुलगा शाळेतून घरी येत असताना त्याला मित्राची पेन्सिल सापडली. त्याने ती घरी आणून आईला दाखवली. आई म्हणाली, "छान आहे, तुला कामाला येईल.' दुसऱ्या दिवशी त्याने एका मुलाची कंपासपेटी चोरुन आणली आणि आईला सांगितले, 'आई, आई आज बघ मला कंपासपेटी सापडली." आई त्याला काही बोलली नाही. असे अनेक दिवस तो काहीना काही वस्तू चोरुन आणत असे. परंतु मोलमजुरी करणाऱ्या आईला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. 

आपला मुलगा या वस्तू आणतो कोठून? त्याला कोठे सापडल्या? त्या परत केल्या पाहिजेत हे सांगायलाही तिला वेळ नव्हता. घरची कामं आणि दिवसभर मोलमजुरी करताना ती थकून जाई. हळूहळू त्या मुलाला वस्तू चोरण्याची सवय जडली. ती त्याच्या इतकी अंगवळणी पडली की शाळेत गुरुजींनी शिकवलेल्या चांगल्या सवयीसुद्धा तो विसरला. पुढे मोठा झाल्यावर तो घरी खोटं सांगून चोरी करायला जाई. आपण चांगल्या ठिकाणी नोकरी करत असून पगारही भरपूर मिळतो असे तो सर्वांना सांगे. 
संस्कार मराठी कथा - Sanskar Katha in Marathi | Marathi Katha | Stories in Marathi

त्याची विचारपूस कोणी करत नसे. आपला मुलगा खरंच चांगली कमाई करतो, असे त्याच्या आईलाही वाटे. पुढे एके दिवशी मोठी चोरी करताना त्याच्या हातून रखवालदाराचा खून झाला. पुराव्यावरुन त्याला पकडून नेले. न्यायालयात खटला चालला. वाला दोषी ठरवून न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशी जाण्यापूर्वी त्याला विचारले. "तुझी शेवटची इच्छा सांग." त्यावर तो म्हणाला, "मला माझ्या आईच्या कानात एक गोष्ट सांगायची आहे." आई जवळ जाऊन त्याने आईच्या कानाचा जोरदार चावा घेतला.

 न्यायाधीशाने विचारले, "असे कृत्य तू का केलेस?" तुला फाशीची शिक्षा झाल्याने ती माऊली आधीच खचून गेली आहे." चोर म्हणाला, "साहेब, आज माझ्या या परिस्थितीला माझी आईच सर्वस्वी जबाबदार आहे. सुरुवातीला मी लहानसहान वस्तू चोरुन आणत होतो. खोटं बोलत होतो. पण माझ्या आईने मला कधी विचारणा केली नाही. शिक्षा केली नाही. त्यावेळीच जर तिने माझ्या कानफटीत मारले असते. तर आज मला शिक्षा भोगावी लागली नसती." न्यायाधीशाने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्याची आई धाय मोकलून रडत म्हणाली, "खरं आहे साहेब माझंच चुकलं. माझ्या बाळाऐवजी मला फाशीची शिक्षा द्या. 

न्यायाधीश चोराला म्हणाले, "तू लहान असताना भलेही तुला आईन संस्कार घडवले नाहीत. पण शाळेत रोज परिपाठाच्या तासाला चांगल्या सवयी, सुविचार, बोधकथा सांगितल्या जातात ना! मग त्यांचे अनुसरण तू का केले नाहीस? अरे, ज्याला आई-वडील नसतात त्या मुलांनी संस्कार कोठून शिकायचे? ते सारेच चोऱ्या करतात का? वाईट मार्गाला जातात का?... नाही ना? देवाने आपल्याला चांगली बुद्धी दिली. चांगलं वाईट ओळखण्याची शक्ती दिली आहे. त्याचा वापर करुन आपणच आपलं जीवन घडवायचं आहे. 

आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडणं कितपत योग्य आहे? अरे, कोणत्या आईला वाटतं की आपला मुलगा चोर-दरोडेखोर व्हावा? प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा सद्गुणी निघावा. शिकून मोठा व्हावा. जर तुला अजूनही असं वाटत असेल की झालेल्या चुका सुधारुन चांगलं जीवन जगावं; तर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज कर." पुढे राष्ट्रपतींनी त्याच्या वयाचा आणि हमीचा विचार करुन त्याची शिक्षा सौम्य केली. तात्पर्य, बालपणी जडलेल्या सवयी ह्या भविष्यात मनुष्याला घडवत असतात. 

म्हणून चांगल्या सवयी, चांगले मित्र, चांगली पुस्तके, चांगले विचार यांचा अंगिकार करावा. दुसरी गोष्ट अशी, की चुका झाल्या तरी सद्गुरु चरणी जो नतमस्तक होतो, त्याला सद्गुरु क्षमा करतो. परंतु केवळ क्षमा याचना न मागता सत्याच्या, न्यायाच्या, सन्मार्गाच्या वाटेवर चालणे हेही तेवढेच आवश्यक आहे. म्हणून म्हटलेलंही आहे की - "आपले भविष्य आपल्या हाती आहे."

संस्कार मराठी कथा - Sanskar Katha in Marathi | Marathi Katha | Stories in Marathi


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post