सत्संगाचं महत्व मराठी कथा
निरंकारी मिशनचे थोर विचारवंत कवी म्हणून प्रसिद्ध असलेले तरुण गुरसिख श्री. विवेक शौकजी यांच्या बापलपणीचा हा प्रसंग आहे. विवेकजींचे पिताश्री श्री. धर्मसिंह शौकजी अधून-मधून बालसंगतमध्ये जात. बालकांना सत्संगाचं महत्व समजावत. एकदा विवेकजींनी शाळेत दिलेला गृहपाठ घरी पूर्ण केला नाही. संध्याकाळी सत्संगाला जाण्याची वेळ झाली.
आता गृहपाठ जर केला नाही तर शाळेत शिक्षा होईल. त्यामुळे रात्रीत गृहपाठ पूर्ण करणे गरजेचे होते. विवेकजी आईला म्हणाले, "आई, माझा गृहपाठ अपूर्ण आहे. तू बाबांना सांग ना, आज मला सत्संगाला नेऊ नका म्हणून!" त्यांच्या मातोश्रींच्या विनंतीनुसार वडिलांनी त्यांना सत्संगाला नेले नाही आणि त्यावेळी विवेकजींना ते काहीही बोलले नाहीत.
दोन-तीन दिवसानंतर धर्मसिंहजी शौक विवेकजींना घेऊन बाहेर फिरायला गेले. रस्त्याने चालता-चालता त्यांच्याशी गप्पा-गोष्टीही करत होते. एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत. आताही त्यांनी बोलता-बोलता विवेकजींना विचारले, "नीटूजी! जर तुम्ही शाळेत दिलेला गृहपाठ केला नाही तर तुमच्या मॅडम काय करतात?" विवेकजी म्हणाले,
"मॅडम शिक्षा करतात आणि सर्वांच्या समोर अपमानही करतात. "अस्सं! जर शाळेचा गृहपाठ केला नाही तर मॅडम शिक्षा करतात हे तुम्ही जाणता आणि त्याबद्दल तुम्ही दक्षताही घेता; परंतु सत्संगात गैरहजर राहिल्यामुळे जे नुकसान होतं त्याबद्दल काही विचार केला आहे का? संत-महापुरुषांची वचनं आपल्या जीवनात चांगला बदल घडवत असतात.
त्यांच्या कृपादृष्टीने आपल्या भाग्यरेषा बदलतात. त्यामुळे सत्संगात न गेल्यामुळे जे नुकसान होतं ते भले दिसत नसलं तरी ते फार मोठे असतं. यापुढे शाळेचा अभ्यास सत्संगाला जाण्याआधी पूर्ण करत जा." अशा प्रकारे एखादी गोष्ट समजावण्याचा शौक साहेबांचा ढंग फार वेगळाच होता. पुढे विवेकजींनी सत्संगाला जीवनात नेहमी अग्रस्थान दिले.
सत्संगाचं महत्व मराठी कथा | मराठी बोध कथा | Marathi Katha | Stories in Marathi
Tags:
मराठी गोष्टी