सत्संगतीचा प्रभाव मराठी कथा
विष्णुशर्मा नावाचा एक प्रख्यात राजज्योतिषी होता. खूप वर्षांनी त्याला एक मुलगा झाला. विष्णुशर्माने मुलाची पत्रिका तयार केली. मुलाच्या पत्रिकेत एकविसाव्या वर्षी तो चोरी करणार असे भविष्य आढळले. ती गोष्ट त्याच्या मनाला खटकत राहिली. दिवसेंदिवस विष्णुशर्मा चिंताग्रस्त होऊ लागला. एके दिवशी विष्णुशर्माला एक साधू भेटला. त्याची चिंतित मुद्रा पाहून साधूने त्याची विचारपूस केली.
साधू म्हणाला, "मुलाला थोडे कळू लागल्यावर त्याला चांगले ग्रंथ वाचून त्यातील गोष्टी सांगत जा. त्याला सत्संगाची गोडी लावा. म्हणजे प्रारब्धानुसार घडणाऱ्या गोष्टींचा जोर कमी होईल.' साधूने सांगितल्याप्रमाणे ज्योतिषी रोज मुलाला घेऊन सत्संगाला जाऊ लागला. उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन करुन रोज साधुसंतांच्या गोष्टी मुलाला सांगू लागला. साधूवर विश्वास ठेवून ज्योतिषी निश्चिंत राहिला. पुढे ज्या दिवशी तो मुलगा एकवीस वर्षाचा झाला; त्या दिवशी तो सर्वत्र सामसूम झाल्यावर हळूच उठला आणि राजवाड्यात गेला.
तो नेहमीच तेथे येत जात असल्याने पहारेकऱ्यांनी त्याला अडविले नाही. महालात त्याला अनेक उत्तमोत्तम वस्तू आढळल्या. तो ज्या ज्या वस्तू घेई त्या त्या वेळी लहानपणी वडिलांनी, "अमूक वस्तू चोरली असता अमुक शिक्षा भोगावी लागते' हे सांगितलेले आठवे. ईश्वर सर्वत्र आहे तो प्रत्येक कर्माचा साक्षी आहे. चोरीच्या कर्माचं दु:खद फळ आपल्याला भोगावंच लागेल हे त्याने सत्संगात ऐकलेले असल्याने तसेच वडिलांकडून देखील ऐकले असल्याने कोणत्याही वस्तूला हात लावण्याचे धैर्य त्याला झाले नाही.
शेवटी तो अश्वशाळेत गेला. तेथे घोडे कोंडा खात होते. कोंडा चोरल्याने अमुकएक शिक्षा होईल हे त्याने ऐकलेले नव्हते आणि समजा शिक्षा झालीच तर सौम्य स्वरुपात होईल, असा विचार करुन त्याने पोत्यात कोंडा भरला आणि खांद्यावर ते पोते टाकून तो घरी निघाला. पोते तळाशी थोडेसे फाटलेले होते. त्यातून थोडा थोडा कोंडा सांडत होता. यापूर्वी चोरी करण्याचे जे विचार त्याच्या मनात घोळत होते; नंतर ते पार नाहीसे झाल्यामुळे त्याने कोंड्याचे पोते घरी गेल्यावर कोपऱ्यात ठेवून दिले आणि तो अंथरुणावर पडला.
त्याला लगेच गाढ झोप लागली. सकाळी राजा फेरफटका मारण्यासाठी जेव्हा निघाला; तेव्हा ठिकठिकाणी कोंडा सांडलेला त्याला आढळला. अश्वशाळेतला कोंडा चोरणारा चोर कोण असणार? याचा शोध घेण्यासाठी राजा त्या सांडलेल्या कोंड्याच्या आधाराने निघाला तो थेट ज्योतिषाच्या घरी पोहचला. कोपऱ्यात कोंड्याचे पोते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. इतक्यात ज्योतिषाने दरवाजा उघडला तोच त्याला राजाचे दर्शन झाले.
राजाने आपले येण्याचे कारण सांगताच ज्योतिषाने मुलाविषयी सारी हकीकत राजाला सांगितली. बालपणी त्याला लावलेली सत्संगाची गोडी आणि धर्मग्रंथातील विचार, संतांच्या गोष्टी यामुळे केवढा मोठा फायदा झाला हे जाणून राजाने ज्योतिषाचे कौतुक केले.
तात्पर्य : आपल्या प्रारब्धात एखादी वाईट गोष्ट अटळ असली; तरी ल्या प्रारब्धाचा प्रभाव कमी करण्याचे सामर्थ्य सतसंगात आहे. त्यामुळे जीवनाची दिशा बदलू शकते. म्हणून बालपणापासून संताची संगत आणि चांगले वि जोडावेत. जीवनाला योग्य दिशा देण्याची ताकद सत्संगात आहे, संत चरित्रात आहे.
सत्संगतीचा प्रभाव मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi
Marathi Stories For Kids With Moral | Chan Chan Goshti Marathi
Tags:
मराठी गोष्टी