नामाची गोडी मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

नामाची गोडी मराठी कथा 

फरीद अतिशय उनाड मुलगा होता. चंचल आणि खोडकर स्वभावाचा; परंतु तितकाच दयाळूही होता. त्याची आई अतिशय धार्मिक वृत्तीची स्त्री होती. ती नेहमी फरीदला सांगे, "बाळ, तू नियमित माझ्याबरोबर नमाज पढत जा. अल्लाची बंदगी कर, प्रार्थना कर.” परंतु आईचे म्हणणे फरीदने कधी मनावर घेतले नाही. या अवखळ पोराला कसं समजवावं हातिच्यासमोर फार मोठा प्रश्न होता.  

एकदा नमाजाची वेळ झाली. आईने फरीदला खाऊ देत म्हटले, "बेटा फरीद! चल माझ्याबरोबर नमाज पढ.” फरीद म्हणाला, "आई, नमाज पढायचा म्हणजे काय करायचं असतं?" "हे बघ बाळ! मी तुला शिकवते. नमाज पढायचा म्हणजे अल्लाची प्रार्थना करायची. त्याचे आभार मानायचे. चुकीची क्षमा मागायची.' अल्लाचे आभार कशासाठी मानायचे?" "कारण अल्लाने हे सर्व विश्व निर्माण केलं, तोच आपलं पालन पोषण करतो, रक्षण करतो म्हणून!" 
नामाची गोडी मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi


"म्हणजे एकट्या अल्लाने हे सगळं केलं.""होय बाळ! ज्याला आपण अल्ला म्हणतो, तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, सर्वांचा पिता म्हणून परमपिताही तोच आहे.' "पण आई, अल्लाची प्रार्थना करुन मला काय मिळणार गं!" त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता देता आईला नाकीनऊ आले. त्याची समजूत कशी पटवावी हे तिला कळेना, तेवढ्यात ती म्हणाली "हे बघ! तुला खाऊ आवडतो ना?"

 "हो" "मग तू प्रार्थनेला बसला, की देव तुला खाऊ देईल." "हो? काय काय देईल?" "अं... खजूर, गूळ, शेंगदाणे, खडीसाखर, गूळ-पापडी असा तुझ्या आवडीचा गोड गोड खाऊ देईल बरं.' "अस्सं! मग मी सुद्धा तुझ्याबरोबर प्रार्थना करीन.” फरीदला ही मात्रा लागू पडली. आईला खूप आनंद झाला. फरीदने धावत जाऊन चटई आणली. आईने त्याला आसन घालून दिले आणि गूपचूप खाऊची पुडी त्याच्या चटईखाली लपवून ठेवली.

 आईने सांगितल्याप्रमाणे फरीद ईश्वराची प्रार्थना करु लागला. नमाज संपल्यानंतर आईने त्याला सांगितले. "बघ बरं, चटईखाली देवाने तुला कोणता खाऊ दिला तो?" त्याने चटईखाली पाहिले तर खरंच खाऊची पुडी सापडली. त्याला खूप आनंद झाला. देवाची प्रार्थना केल्यावर देव आपल्याला खाऊ देतो यावर त्याचा विश्वास बसला. पुढे रोज तो आईबरोबर प्रार्थना करी. नित्यनेमाने त्याला खाऊही मिळे. असे अनेक दिवस गेले. 

एके दिवशी नमाजाची वेळ झाली. आई घरात नव्हती. फरीदने प्रार्थनेसाठी चटई अंथरली. ईश्वराच्या नामस्मरणात तो तल्लीन झाला. आईला बाजारातून घरी यायला उशीर झाला. झपझप पावलं टाकत ती घरी आली. तिला वाटलं नमाज संपल्यावर फरीदला चटईखाली खाऊ मिळाला नाही तर त्याचा विश्वास उडेल, तो आकांड-तांडव करील, म्हणून ती घरात आल्या आल्या म्हणाली, "बेटा फरीद!

 आज ना देवाला खूप घाई होती म्हणून देवाने तुझा खाऊ माझ्याकडे देऊन ठेवला आहे. हा घे तुझा खाऊ” असे म्हणून ती खाऊचा पुडा त्याला देऊ लागली. तिच्याकडे स्नेहार्द्र नजरेने क्षणभर पाहात फरीद म्हणाला, "आई, तू किती चांगली आहेस गं! खरं सांगू, आता मला तुझ्या या गोड खाऊची अजिबात गरज नाही. ईश्वराच्या नामापुढे मला हे सर्व पदार्थ फिके वाटतात.

 ईश्वराच्या नामात जी गोडी आहे ती या गोड पदार्थात नाही, हे मला कळून चुकलंय. पण ही गोडी लावण्यासाठी तू जे प्रयास केलेस त्याबद्दल खरंच मी तुझा कधीही उतराई होऊ शकत नाही.' हाच अवखळ फरीद पुढे 'संत शेख फरीद' म्हणून नावारुपास आला. म्हणून आई-वडिलांचे, गुरुजनांचे आदेश उपदेश नेहमी आचरणात आणावे.

नामाची गोडी मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post