डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण | DR Sarvepalli Radhakrishnan Bhashan
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर १८८८ ते १६ एप्रिल १९७५)
'बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो.'
या साने गुरुजींच्या प्रार्थनेप्रमाणे भारतभूची शेकडो मुले भारत बलशाली होण्यासाठी प्रयत्न करत होती. स्वातंत्र्य आंदोलनातले नाव, अनुभव पाठिशी घेऊन, हा देश माझा आहे या समजुतीनं अनेक जण पुढे जात होते. कोण राजकारणात रमला होता. कोण समाजकारणात गुंतला होता. कोण स्वभाषेच्या विकासाची स्वप्नं पाहात होता. तर कोण शिक्षणासारख्या क्षेत्रात हा देश प्रगत झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होता. अशा अनेकांपैकी एक होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन !
आंध्र प्रदेशातील तिरुत्तणी या छोट्या गावातील अत्यंत धार्मिक कुटुंबात सर्वपल्ली राधाकृष्णनांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण वेलोर आणि तिरुत्तणी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण मद्रास येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हैसूर विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य जवळजवळ दहा वर्षेपर्यंत केले. इंग्रजी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व अनेकांना खिळवून ठेवायचं. एखादी घटना अत्यंत नेमकेपणे आणि नेटकेपणे ते सांगायचे. वक्तृत्वाची तर त्यांना जन्मजातच देणगी होती. अगाध ज्ञान, तत्त्वज्ञानाची सखोल जाण यामुळे ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकायचे.
वक्तृत्त्वाच्या जोडीलाच त्यांचे लेखनाचे पण कार्य सातत्याने सुरू असायचे. टागोरांचे तत्त्वज्ञान, गौतम बुद्ध, महात्मा गांधी, महत्त्वाची उपनिषदे, भारतीय तत्त्वज्ञान (दोन खंड) अशी जवळ जवळ ३५ पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या या लेखनामुळे भारतातील थोर तत्त्ववेत्त्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
आंध्र आणि बनारस विद्यापीठांचे कुलगुरू, १९५३ मध्ये दिल्ली विद्यापीठाचे कुलपती, १९६२ साली भारताचे दुसरे राष्ट्रपती अशी अनेक उच्च पदे त्यांनी भुषविली. या विद्वान गृहस्थांना भारतीय राजकारणात आणण्याचे प्रयत्न केले होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यांच्या विविध अनुभवाचा फायदा भारतीय शासन व्यवहाराला होईल असा ठाम विश्वास त्यांचा होता. म्हणूनच त्यांनी हे मोठे कार्य केले होते.
एक तत्त्वज्ञ पुरुष म्हणून ख्याती असलेले राधाकृष्णन जेव्हा भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा विचारवंत रसेल म्हणाले होते, “हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मोठा सन्मान आहे."
चीन आणि रशिया या दोन देशांत परराष्ट्र वकील असताना आणि व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांनी भेट दिली होती. त्यावेळीसुद्धा भारताचा शांतीचा संदेश राधाकृष्णन यांनी तेथील लोकांपर्यंत पोहोचवला. स्टॅलिनसारख्या हिंसात्मक मार्गाचा अवलंब करू पहाणाऱ्या व्यक्तीला भारतीय संस्कृतीची शिकवण सांगून हिंसेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अन्यायाला विरोध करणारं त्यांचं मन होतं. पण त्यासाठी क्रूरताच अंगी असायला पाहिजे असे नव्हे.
शांतीने पण सर्व गोष्टी शक्य होतात अशी त्यांची भूमिका होती. अणूचाचणीला त्यांचा संपूर्णतया विरोध होता. जगात या प्रकारामुळे संशयाचं वातावरण निर्माण होईल अशी समजूत होती. आज शांततेचा पुरस्कर्ता, त्यांचा भारत अणूचाचण्या करून संहारक शस्त्रांची होड लावत बसला आहे. यामुळे कोणकोणते संशयाचे ढग आपल्या डोक्यावर झाकोळले आहेत ते आपण पाहतच आहोत. यावरून राधाकृष्णनांचं द्रष्टेपण आपल्याला दिसून येतं.
धर्म आणि नीतिशास्त्राचे विद्वान पाहुणे प्राध्यापक म्हणून त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्याने दिली. चीन, रशिया यांच्या जोडीला जगातील अनेक मान्यवर विद्यापीठातून त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान नेवून पोहोचवलं. स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांच्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे राधाकृष्णन हेच थोर तत्वज्ञान प्रसारक होते.
शिक्षण, तत्त्वज्ञान, प्रशासन अशा विविध स्तरावर केलेल्या प्रचंड कार्याची पावती म्हणून त्यांना १९५४ साली 'भारतरत्न' हा किताब देण्यात आला होता. त्यांनी जरी विविध पदे भूषविली तरी त्यांच्या मनातला 'शिक्षक आणि
त्यांचं शिकवणं' हे कधीही बाजूला पडू शकलं नाही. किंबहूना मी ज्या-ज्या वेळी अध्यापन करतो, भारतीय संस्कृतीचे सार समजून सांगतो. त्याच वेळी मला सर्वात जास्त आनंद मिळतो अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या कार्यामुळेच पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या या थोर तत्त्वज्ञ, अध्यापकाचा मृत्यू १६ एप्रिल १९७५ रोजी झाला. निद्रिस्त जगाला जागं करत राहणारे एक थोर शक्तिपीठच त्यांच्या रूपाने नाहीसे झाले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण | DR Sarvepalli Radhakrishnan Bhashan in marathi
Related searches :
- dr sarvepalli radhakrishnan in hindi
- dr sarvepalli radhakrishnan speech in english
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन विकिपीडिया
- सर्वपल्ली राधाकृष्णन के शैक्षिक विचार
- 10 lines on dr sarvepalli radhakrishnan in english
- सर्वपल्ली राधाकृष्णन के माता-पिता का नाम
- सर्वपल्ली राधाकृष्णन पुस्तकें pdf
Tags:
मराठी भाषण