अति तेथे माती मराठी निबंध
अति तेथे माती मराठी निबंध
एखादया माणसाचा स्वभाव खूप मवाळ असला , तर त्याचा इतर लोक गैरफायदा घेतात . चांगल्या छंदाचाही अतिरेक हे पुढे व्यसन ठरते . कोणत्याही व्यसनाचा अतिरेक अखेरीस जीविताच्या नाशाला कारणीभूत ठरतो . हल्ली पुष्कळ लोक फॅशन म्हणून सुरुवातीला अल्पप्रमाणात मद्यपान करतात आणि पुढे त्याच्या अधीन होऊन आपला नाश ओढवून घेतात . मित्रांच्या आग्रहाखातर धूम्रपान करणारा पुढे अट्टल व्यसनी बनतो . या अतिरेकी व्यसनाचे प्रभावी चित्र नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपल्या ' एकच प्याला ' या नाटकात रंगवले आहे . या नाटकातील धीरोदात्त , सुशील , कर्तबगार नायक सुधाकर हा सुरुवातीला केवळ ' एकच प्याला'च्या अधीन होतो आणि मग हळूहळू त्याला व्यसन जडते , अतिरेक होतो आणि त्याचे अधःपतन होते .
अनेकदा स्वभावातील अतिरेकी वृत्तीही व्यक्तीच्या घाताला कारण ठरते . दुसऱ्यांविषयी संशय घेण्याच्या वृत्तीचा अतिरेक सर्वनाश ओढवून घेतो . याचे वास्तव चित्रण प्रसिद्ध आंग्ल नाटककार शेक्सपीअर याने आपल्या ' ऑथेल्लो ' या नाटकात केले आहे . द्वेष , असूया यांचा अतिरेक माणसाला वाममार्गाकडे नेतो . सदा सुखात लोळणाऱ्या व्यक्तींना दुःखाचा थोडासा आघातही सहन करता येत नाही . मग अशा व्यक्ती कित्येकदा आत्महत्या करण्यास उदयुक्त होतात . अतिरेकाचे भयंकर परिणाम दाखवणाऱ्या दोन कथा प्रसिद्ध आहेत . सोन्याची विलक्षण हाव असलेल्या मिडास राजाने देवाकडून वर मिळवला की , मी ज्या वस्तूला हात लावीन ती सोन्याची होऊ दे .
त्यामुळे त्याला खाणेपिणे अशक्य झाले . एवढेच नाही तर त्याची लाडकी लेकही सोन्याचा पुतळा झाली . टॉलस्टॉयच्या कथेतील माणूस जमिनीच्या हावेसाठी मरेपर्यंत धावला व मृत्यूला सामोरा गेला . त्याचा देह पुरण्यास सहा फुटांची जमीन पुरेशी ठरली . म्हणून प्रत्येकाने अतिरेक टाळावा व समतोल साधावा , हेच आयुष्यातील समाधानाचे गमक आहे .
Tags:
मराठी निबंध लेखन