जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध
जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध
त्या दिवशीच्या कीर्तनात बाबांनी निरूपणासाठी हाच विषय घेतला . त्यांच्या मते , सर्व माणसे ईश्वराचीच लेकरे आहेत . ती ईश्वराचीच विविध रूपे आहेत . या माणसांची सेवा हीच प्रत्यक्ष ईश्वराची सेवा होय . देवाची भक्ती करायची असेल , त्याची सेवा करायची असेल , तर देवळात जायची गरज नाही , तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची गरज नाही . प्रत्येक माणसाचा आत्मा हाच परमेश्वर आहे . आपण माणसातच ईश्वर शोधला पाहिजे . माणसाचीच सेवा केली पाहिजे . दुर्दैवाने काही जणांना धडधाकट निरोगी शरीर लाभत नाही . काहीजण जन्मतःच अपंग असतात . काहीजणांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले असते .
ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे शरीर साथ देत नसते . या सगळ्यांना साधे माणसासारखे जीवन जगणे कठीण बनते . शरीर दुबळे असल्याचे दुःख असतेच , पण समाजात लोक उपेक्षा व अवहेलनाही करतात . याचेही दुःख असतेच . यामुळे या सर्वांचे जीवन दुःखाने व्यापलेले असते . यात खरे तर या दुर्दैवी माणसांचा काहीही दोष नसतो . त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसतो . निसर्गानेच हे दुःख त्यांच्यावर लादलेले असते . अशा लोकांना आधार देणे , त्यांचे जीवन सुसह्य करणे आवश्यक असते . म्हणून इतरांनी या अशा लोकांची सेवा केली पाहिजे . त्यांना मदत केली पाहिजे . ते आनंदी बनले , तर देवालाच आनंदी केल्यासारखे होईल . ती ईश्वरसेवाच ठरेल .
समाजात काहीजणांना जातिपातीच्या कारणाने कमी दर्जाचे मानले जाते . त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा खूप झगडावे लागते . त्यांना समाजात मानाने वागवले जात
नाही . गरीब व अनाथ यांचीही अशीच स्थिती असते . त्यांनाही आधाराची गरज असते . त्यांना आधार दिला , त्यांची सेवा केली तर तीही ईश्वरसेवाच ठरेल . दीनदुबळ्यांना आधार देणे , त्यांना सुखी करणे ही ईश्वराची पूजा करण्याइतकीच श्रेष्ठ गोष्ट आहे . जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा । हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान मनात बाळगून जे यथायोग्य आचरण करतात , तेच खरे देवभक्त होत . म्हणून कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे हे खरे देवभक्त ! हरिजनांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून प्रायोपवेशन करणारे पूज्य साने गुरुजी हेसुद्धा खरे देवभक्तच !
Tags:
मराठी निबंध लेखन