तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.
तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.
ज. वि. पवार (१९४४)
प्रसिद्ध कवी, कादंबरीकार. १९६६ नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक. ‘बलिदान’ ही कादंबरी; ‘नाकेबंदी’ हा काव्यसंग्रह; ‘वडवानल’ ही दीर्घ कविता; ‘उच्छ्वास युगंधराचे’, ‘अस्तित्वाच्या रेषा’, ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर’ ही संपादने; ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ’ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ, सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे.
Tags:
मराठी कविता