रसग्रहण : दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा | Davat Alis bhalya Pahate Kavita Rasgrahan 11th Marathi
दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा | Davat Alis bhalya Pahate Kavita Rasgrahan 11th Marathi
रसग्रहण : 1
प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे , याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही ' दवांत आलीस भल्या पहाटी ' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे . प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकूळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव आहे .
शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ , धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते . या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार केली आहे . अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे .
समकालीन प्रेमकवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत . ' प्रेमभावनेचे हिरवे धागे ' , ' डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा ' , ' आठवणींची रांग ' , ' तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या ' , ' पावलांचा गंध ' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकूळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट झाली आहे .
रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे . प्रेमात बुडून गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे . तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय ? प्रेमाची परिणती विरहात होते का ?
केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का ? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत राहतो . ' अनुष्टुभ ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमुळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते . त्यामुळे प्रेमातील कातरता अधोरेखित करणारी ही वा . सी . मर्डेकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे
रसग्रहण : दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा | Davat Alis bhalya Pahate Kavita Rasgrahan 11th Marathi
रसग्रहण : 2
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही बा.सी. मर्डेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. पण हे प्रेम भासआभासाच्या रेषेवर असणारे आहे. बा.सी.मर्डेकर यांनी कवितेत नवीनता आणताना अनेक प्रयोग केले. कवितेचे शीर्षकच पाहता ते समजून येते. ‘पहाटे’ असं न म्हणता ‘पहाटी’ असा शब्द उपयोजून एक नवीन शब्द साहित्यात रूढ केला असे म्हणावे लागेल.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत. बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल.
तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते.
ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदर्याने उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावन गेले. चालता चालता तिच्या पावलांच्या खणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या, त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती.
प्रेयसीच्या चालण्यातच तोरा असं म्हटल्यामुळे ती सौंदर्यवती असल्याचं स्पष्ट होतं, तिच्या मनातील प्रेमभाव कवीच्या मनात पेरताना त्याला जाणवलेली तरलता तो ‘पेरत गेलीस तरल पावलांमधली शोभा’ असे म्हणतो. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते.
ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. या कडव्यात कवीने दोन ओळी नंतर एकाच शब्दाची एक ओळ घेऊन त्याच्या मनातील ओढ व्यक्त करण्याचा यत्न केला आहे. तसंच हिरवे धागे या शब्दातून नात्यातील हिरवेपणा स्पष्ट केला आहे. हिरवे हे विशेषण वापरून त्या नात्यातील कोवळीकता, ताजेपणा स्पष्ट केला आहे.
तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण झाली.
तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर थेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हदयापर्यंत पोहोचत होता. या कडव्यात कवी प्रेयसीच्या डोळ्यातील प्रेमभावना खट्याळपणा दाखवताना त्याला डाळिंबाच्या दाण्यांची उपमा देतो. डाळिंबाचा रंग जसा बी असतो.
हा गुलाबी रंग तिच्या डोळ्यातही दिसतो. तिच्या नजरेतील प्रेमसूचकता पाऱ्यासारखी असल्यामुळे ती त्याला टिपता येत नाही आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं बरं सांगू शकतो?
कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावना याच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.
आपल्या मनातील भावभावना स्पष्ट करताना कवी त्या आठवणींना कोमल ओल्या आठवणी म्हणतो. त्यातील ओलाया, जिव्हाळा हा कोमल ओल्या या शब्दातन प्रकट होतो. एथल्याच हा बोलीभाषेचा शब्द वापरून कवी आणखी एक नवा प्रयोग करू पाहतोय…कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे, त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात.
ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लज्जेमुळे आलेला असावा, प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत, ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.
प्रेयसीच्या मनातील नाजूक भाव अधोरेखित करताना तिच्या नखांवरही ते गुलाबी भाव उमटल्याचे स्पष्ट करतो. आकाशात तर चांदण्या असतातच पण तिच्या हातावरही त्या चांदण्यांचा स्पर्श झालेला आहे. असा भाव व्यक्त करताना शुभ्र चांदण्या (स्नेहाच्या) कुणी गोंदाव्या असे म्हणतो. त्यातून प्रियकराची तरल संवेदना प्रकट होते.
पहाटेच्या दांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.
जो अनुभव घेता आला नाही पण त्याची अनुभूती अप्रत्यक्ष स्वरूपात मिळाली ते प्रकट करताना कवी ती पहाटे आल्याचं म्हणतो. अभ्रांची शोभा ही सुद्धा नवीन कल्पना कवीने मांडलेली आहे. प्रेमाचा रंग, गंध असतो तो तरल संवेदनांच्या लोकांनाच जाणवतो. कवीला तो जाणवतो.’
ते व्यक्त करण्यासाठी कवी ‘मंद पावलांमधल्या गंधा’ असं म्हणतोय. त्या पावलांनांही गंध प्राप्त झाला, त्या वाटेला आणि मनातील प्रीतीलाही ‘गंध’ या शब्दाचे गंधा हे सामान्य रूप वापरून ‘एकदा’ या शब्दाशी लय साधण्याचा यत्न केलेला आढळतो. विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.
रसग्रहण : दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा | Davat Alis bhalya Pahate Kavita Rasgrahan 11th Marathi
रसग्रहण : 3
'दवांत आलिस भल्या पहाटीं' ही कवी बा. सी. मर्ढेकरांनी लिहिलेली प्रेमकविता आहे. प्रेमातील परस्परविरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मन:स्थिती टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन करणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे.
पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यांमुळे कवीचे मन मोहरून गेले; परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली तेव्हा कविमन व्याकुळ झाले, असा आशय कवितेतून व्यक्त होतो.
ही फक्त प्रेमकविता नाही, तर भावकविता आहे. या कवितेची भाषा भावोत्कट, तरल असून सूक्ष्म भाव-भावनांची आंदोलने टिपणारी आहे. रसिकपणे प्रेयसीच्या रूपसौंदर्याचा, चालीतील मनमोहकपणाचा आस्वाद घेता घेता प्रेमाच्या अनाकलनीय भवितव्याचा वेध घेऊ पाहणारी आहे. आपल्या अनुभवाची कलात्मक व सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली या कवितेत आढळते.
या कवितेत कवीने नव्या आशयाच्या प्रतीक-प्रतिमांचा चपखलपणे वापर केलेला आढळतो. 'हिरवे धागे, 'तळहाताच्या नाजुक रेषा, 'डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा' या प्रतीक-प्रतिमा खूप बोलक्या आहेत. त्या सूचकपणे कवितेत पेरल्या आहेत. येथे भाषेसह, विरामचिन्हांचाही नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, 'पुढे जराशी हसलिस' नंतर कवीने अर्धविरामाचा वापर करत 'मागे' या शब्दाची विशिष्ट मांडणी केली आहे. जेणेकरून वाचकमनात 'मागे' या शब्दाविषयी कुतूहल जागे होते.
या कवितेत काव्यसौंदर्य, भावसौंदर्य व आशयसौंदर्य पुरेपर आढळते. एका शब्दाच्या विविध अर्थच्छटा येथे पाहायला मिळतात.
उदाहरणार्थ
'लक्ष्य' या शब्दाचे दोन अर्थ ध्वनित होतात. लक्ष्य म्हणजे तिचे लक्ष आणि लक्ष्य म्हणजे 'नेमः त्यातूनही कवितेच्या आशयसौंदर्यात भर पडली आहे. ही प्रेमकविता मुक्तछंदात रचलेली असून समर्पक शब्दांत कवीच्या भावना व्यक्त करते. स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीच्या तळमळीचे, विरहाचे, मनाच्या व्याकुळतेचे येथे दर्शन घडते.
त्यामुळे, कविता वाचल्यानंतर शृंगाररसाचा प्रत्यय येतो. अडलिस, आलिस अशा -हस्व शब्दांमुळे व काही कडव्यांत यमक योजल्यामुळे कवितेत आंतरिक लय साधली गेली आहे. प्रस्तुत कवितेचे रचनासोंदर्य, तिच्यातील कल्पनासौंदर्य अप्रतिम आहे, त्यामुळे ही कविता मला खूप आवडते.
दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा
दवांत आलिस भल्या पहाटीं
शुक्राच्या तोऱ्यांत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा.
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
-मागे
वळुनि पाहणें विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कुठे अन् कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणीं पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटीं
अभ्रांच्या शोभेंत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
(मर्ढेकरांची कविता)
Davat Alis bhalya Pahate Kavita Rasgrahan 11th Marathi
Tags:
रसग्रहण इयत्ता अकरावी