रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi


रसग्रहण : 1

आजी, आई, स्वतः व मुलगी या चार पिढ्यांतील स्त्री जीवनशैलीचे चित्रण व स्त्री-स्वातंत्र्याचा आलेख कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेत शेव पांजळपणे अधोरेखित केला आहे. सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधने हळूहळू झुगारून आजची स्त्री कोणत्या टप्प्यावर उभी आहे.

 तिला स्त्री-शक्तीची झालेली जाणीव ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. भूतकाळातील स्त्री सघषमय प्रवास करीत आजच्या शतकात सक्षम व मूल्यगर्भ आयुष्य जगत आत्मविकास करते आहे. ती आता अन्यायाच्या विरोधात स्वत:च उभी ठाकली आहे, हा बहुमोल संदेश ही कविता देते.

'पायातील पैंजण' हे प्रतीक कवयित्रींनी सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधनांसाठी वापरले आहे व प्रत्येक काळात बदलत जाणारी पायातील अडसरांची रूपे प्रस्थापित केली आहेत आणि या प्रतीकांतन स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे.

स्वयंपाकघर व माजघरापर्यंत मर्यादित असलेले व बंधनांनी केलेल्या जखमा सहन करणारे आजीचे आयुष्य. पैंजण नाकारले तरी तोरड्यांमुळे झालेल्या वेदना दुर्लक्षित करून अंगणापर्यंतचा प्रवास सुसहय करणारी आई. पिंजण व तोरड्या हद्दपार करून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येतो, म्हणून काही बंधनांच्या मर्यादेत राहणारी स्वतः कवयित्री आणि । स्वत:ला स्त्री-शक्तीची जाणीव झालेली व अन्यायाला पायदळी 'तुडवण्याची धमक असलेली कवयित्रींची मुलगी. 

स्त्रीच्या या वेगवेगळ्या कालखंडांतील चार रूपांतून आपल्याला स्त्री-जीवनाच्या खडतर प्रवासाची जीवघेणी कथा कळते. मुक्तछंद प्रकारात लिहिलेली प्रस्तुत कविता तिच्या सहजसुंदर ओघवत्या शब्दकळेने विलक्षण परिणामकारक ठरली आहे. 

आक्रस्ताळेपणाने किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीच्या विद्रोह न मांडता स्त्री-वेदना मूकपणे किती बोलकी व प्रत्ययकारी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही कविता अभिजात साहित्यात गणली जावी. स्त्री हक्क, स्त्री-स्वातंत्र्य व स्त्री-शक्ती या त्रिवेणी भावनांची वैचारिक वीण सशक्त व ठोस शब्दांत व्यक्त करणारी प्रस्तुत कविता, मला अंत:स्थ हृदयाला भावली आहे.

रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : 2

आजीला संसारात त्रास होत असेल, संकाट येत असतील तरीही त्याला सहन करत ती आनंदात राहायची. दोन दोन किलोचे पैंजण म्हणजे येणार संकट ती सहन करायची आणि त्याच्या नादात ती कधीच बाहेर पडली नाही. आई उंबरठा ओलांडून बाहेर आली पण तिला ओटा सोडता आला नाही. 

आजीपेक्षा तिचे बंधन कमी होते पण तरीही तिने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. ती स्वतःला घरातील निर्णयात स्थान मिळण्याच्या कृतीतच समाधान मानत होती. आजी आणि आई पेक्षा कवयित्रीचे संकट, बंधन कमी होते. पण बाहेर पडायला मिळत होते, मोकळा श्वास आणि रूढी पासून सुटका होती म्हणून कवयित्रीने असणाऱ्या बंधनाचा स्वीकार केला. तिघांच्या तुलनेत मुलीला बाहेरच्या जगात मुक्त आयुष्य जगायला मिळत होते.

रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : 3

कवयित्री नीलम माणगावे यांनी ‘पैंजण’ या कवितेत स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रवासात कशी आणि कोणती स्थित्यंतरे झाली याचे वर्णन केले आहे. प्राचीन काळातील स्त्री ते आताच्या काळातील स्त्री यांचे प्रगतीच्या वाटेवरचे टप्पे पाहता स्त्रीने स्वत:चे स्वातंत्र्य मिळवले. तिचा आत्मविकास तिने केलेला आहे. या कवितेची रचना मुक्तबंधात करताना काही प्रतिमांचा, उपमांचा वापर कवयित्रीने केलेला आहे.

कवयित्री अगदी पारंपरिक स्त्रीचा उल्लेख करताना आजी म्हणून करते: आजी तिच्या काळात दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून स्वयंपाकघरातून माजघरात, माजघरातून स्वयंपाकघरात एखादया सम्राज्ञीसारखी फिरायची. आजीला केवळ या दोन ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य होतं;

पण या दोन्ही ठिकाणी आपण आपला अधिकार गाजवू शकतो याची जाणीव तिला होती. अखंड कुटुंब, त्याच्या जबाबदाऱ्या पेलताना तिला मिळणारा मान तिला महत्त्वाचा वाटत होता. आपल्या घरात आपण सम्राज्ञी असल्यासारखी वावरायची. तिच्या पायातल्या पैंजणांमुळे तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे. घोटे काळे ठिक्कर पडायचे. या जबाबदाऱ्यांमुळे जास्तीची कामे पडायची, अखंड आयुष्य घरातील दोन खोल्यात जगायला लागायचं.

पण त्या संसाराचा, जबाबदाऱ्यांचा नादच इतका की त्यामुळे आपलं माणूसपण भरडलं जातं याचे भानच नसायचं, पैंजणाखाली फडके बांधून जखमांना बरं करत करत आजी जगायची, संसाराचा भार पेलताना थकून जायची, अपमान गिळायची, अत्याचार सहन करायची. पण संसारात या जखमा सहन कराव्या लागणारच याची जाणीव ठेवून ती आहे त्यात सुख मानायची.

यामध्ये पैंजण या अलंकाराचा वापर करून कवयित्रीने तिच्या पायातील बेड्यांचा उल्लेख केला आहे. या बंधनांनी त्रास झाला, जखमा झाल्या तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती.

कवयित्री आपल्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांवरील बंधने कथन करताना आईचा उल्लेख करते. आईने पैंजण सोडून नाजूक, हलक्या तोरड्या घातल्या. तिला आईचं दुखणं ठाऊक होतं, तोरड्या घातल्यामुळे आता आपल्या पायाला कमी जाच होईल असं तिला वाटलं. पाय दुखले, खुपले चिघळले नाहीत.

मग तिला स्वयंपाकघर ते गच्चीपर्यंत हिंडण्याची मुभा मिळाली. आपल्या अगोदरच्या पिढीला हे स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे तिला आनंदच झाला. या तोरड्यांचा त्रास व्हायचाच. अधून मधून साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबकळायचे पण तरीही आपल्याला घरातील काहीजण विचारतात, काही हक्क आपल्याकरता आहेत याच्या जाणिवेने ती सारा जाच, दुखणं दुर्लक्षून ती स्वत:च्या घरात राणी असल्यासारखी भिरभिरायची. इथं भिरभिरणं या क्रियापदामधूनच ती स्थिर कुठेही नसायची याची जाणीव कवयित्री करून देते.

स्वत:च्या काळातील स्त्रीचा उल्लेख करताना ती म्हणते की अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजण, तोरड्यांना कवयित्रीने अगदी हद्दपार केलं.

हलक्या अशा चपळाईने सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून कवयित्रीने घराच्या बाहेर पाऊल टाकलं. पण कधीतरी चपला, बूट, सँडलही बोचतात. घराच्या बाहेर पडताना पायाच्या सुरक्षिततेसाठी या पायताणांचा वापर ती करते. परंतु या पायताणांचा त्रास ती सहन करते. आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी घरात असतानाही काही गोष्टींच्या वेदना होत्याच. ती बाहेर पडली तेव्हा वेदना सहन कराव्या लागत आहेत.

पण आपल्याला घराबाहेर मिळणारे सन्मान, स्वातंत्र्य याकरता तिने सारे दुःख सहन केले. आताच्या मुलींच्या स्वातंत्र्याबाबत भाष्य करताना कवयित्री म्हणते की माझी मुलगी पैंजण, तोरड्या तर घालणार नाही. चप्पल, बूट, सँडलही नको, कोणतीच बंधने, त्यातून होणारी घुसमट आताच्या मुलीला, स्त्रीला नकोय.

त्या सगळ्याच्या पलिकडे जाऊन केवळ आपल्या सामर्थ्याने तिला पुढे जायचे आहे. पाय पोलादी करायचे आहेत, कारण कोणत्याही वेदना पोचल्या तरी त्या सहन करण्याची तयारी आहे. पुढच्या शतकाआधी हे व्हावं असं तिला वाटतं.

रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : 4

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.


कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ 

तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा | Painjan kavita Rasgrahan 11th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post